26.6 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriजिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

किनारपट्टी भागात पावसाचा सर्वाधिक जोर होता.

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना दणका दिला. सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाल्याने शेवटच्या टप्प्यात आलेल्या हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. बागायतदारांना आंबे काढण्याचे वेळापत्रक बदलावे लागले. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यामुळे आंबा गळून गेला. बुधवारी पहाटेच्या सुमारास वेगवान वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक आभाळ भरून आले आणि सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दुचाकीचालकांची पावसापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तारांबळ उडाली होती. मात्र, अनेकजण भिजले. सकाळी चालायला बाहेर पडणाऱ्यांनाही कसरत करावी लागली.

या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. किनारपट्टी भागात पावसाचा सर्वाधिक जोर होता. खेड, दापोली, राजापूर, संगमेश्वर, लांजासह रत्नागिरी तालुक्यात पावसाची नोंद झाली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम हापूसवर झाला आहे. आंबा बागायतदारांचे वेळापत्रक बिघडले असून अनेकांनी सकाळच्या सत्रात आंबा काढणी बंद ठेवली होती. तसेच बागांमध्ये आंबा गळून गेला होता. त्यामुळे नुकसान झाले आहे. बागेत आंबा पडून राहिल्याने फळमाशीच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे. तसे झाले तर फळाच्या दर्जावर परिणाम होईल. आधीच उत्पादन कमी असल्याने बागायतदार त्रस्त आहेत. त्यात शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर संक्रात आली आहे.

खेड तालुक्यासह खाडीपट्टा परिसरातही पावसाने हजेरी लावली. बांधकाम व्यावसायिक, वीटभट्टी व्यावसायिक, आंबा उत्पादक व जनावरांचा चारा, सर्वसामान्य गरीब नागरिकांचे लाकूडफाटा आदींचे मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले आहे. लग्नसराई सुरू असल्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे लग्नमंडपात जमलेल्या मंडळींची तारांबळ उडाली. मंडपात जमलेल्या वधू-वरांसह सगळेच पावसाने भिजून गेले. यासोबतच वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्च्या विव्य भिजल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. गणपतीपुळे येथील मोस्या चौक ते आपटा तिठा मार्गावरील एका दुकानाच्या गाळ्यांवर भलेमोठे झाड पडल्याने लाखाचे नुकसान झाले आहे. ते झाड रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी गणपतीपुळे शिवसेना शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, चंडिका टुर्स आणि ट्रॅव्हलचे मालक किशोर गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष समीर कदम, महेश माने व गावकर आदींनी झाड रस्त्यावरून बाजूला केले.

RELATED ARTICLES

Most Popular