गुरूवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर तालुक्यातील पूर्व विभागात तसेच संगमेश्वर तालुक्यातील माखजन,आरवली आदी सह्याद्रीच्या पट्ट्यात कोसळलेल्या पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागात काही ठिकाणी गारा कोसळल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात गेले २ दिवस संमिश्र वातावरण आहे.गुरूवारी दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता.तर रत्नागिरी सकाळच्या वेळी पाऊस पडेल असे वातावरण होते. रत्नागिरी आणि परिसरात दिवसभर असेच वातावरण राहील. फारसा पाऊस कुठे पडला नाही.

चिपळुणात पाऊस :- चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागात गुरूवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर अचानक पाऊस कोसळला. काही भागात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी धास्तावले असून पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. जेमतेम ५ ते १० मिनिटे पाऊस बरसला. त्यामुळे हवेत गारवा आला.

टेरवमध्ये घरांचे नुकसान :- या पावसासोबतच टेरव गावात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ७ घरांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. मात्र ही हानी मोठी नाही. हा दिलासा म्हणायला हवा. टेरव, अलोरे,शिरगांव परिसरात गुरूवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. गारा कोसळल्या पूर्व भागात काही गावांमध्ये पावसासोबतच गारा कोसळल्याचेही वृत्त आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनाही झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने कोठेही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.सह्याद्री पट्ट्यातही पाऊस त्याचप्रमाणे गुरूवारी सायंकाळी संगमेश्वर तालुक्यातील माखजन, तुरळ, आरवली, बुरंबाड आदी गावातही पाऊस कोसळला. सह्याद्री पट्ट्यात पाऊस जोरदार कोसळल्याचे वृत्त हाती आले आहे. मात्र सुदैवाने कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही.