चिपळूण येथील रेल्वे स्थानकावरील पेपर बुक स्टॉल गेली दोन वर्षे बंद आहे. एटीएम मशीन ठप्प आहे. येथे प्रवाशांच्या माहिती करिता डिजिटल बोर्ड नाही. दुसऱ्या प्लेटफर्मवर तिकीट खिडकी नाही. तसेच येथील रस्ता पूर्णतः नादुरुस्त आहे. अशा अनेक समस्यांमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्काळ या सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून द्या अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.येथील २ नंबर फ्लॅटफार्मवर एक तिकीट खिडकी असावी ही गेली कित्येक वर्षाची मागणी आहे. तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना १ नंबर फ्लॅटफार्मवर जाऊन तिकीट घ्यावे लागते व पुन्हा २ नंबर वर यावे लागते. प्रवाशांना उशीर झाला किंवा रेल्वे लवकर आली तर प्रवाशांना १ नंबर फलाटवर जाऊन तिकीट काढणे शक्य होत नाही. परिणामी प्रवास होत नाही किंवा मग दंड भरावा लागतो. या बाबत सतत ओरड असताना देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था तर फार भयानक झाली आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणारे रस्ते रेल्वे प्रशासनानेच दुरुस्त करण्याचे निर्देश आहेत. मात्र येथील प्रचंड खराब होऊन अपघात होत असताना देखील रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. काही प्रवाशांनी थेट कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीकडे या बाबत तक्रार केली होती.तातडीने प्रवाशांच्या सामस्याकडे लक्ष देऊन निकाली काढण्यात यावे. अन्यथा कोकण रेल्वे अन्याय निवरण समिती रस्त्यावर उतरले असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.