सलग ३ दिवस जोडून आलेल्या शासकीय सुट्टया आणि रविवारी (ता. ९) असलेली संकष्टी चतुर्थी यामुळे प्रसिध्द पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. गेल्या ३ दिवसांमध्ये ४० हजाराहून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात भेट दिल्याचा अंदाज आहे. परिक्षांचा कालावधी सुरु असतानाही गणपतीपुळ्यातील गर्दी व्यावसायीकांसाठी आश्वासक ठरली. मे महिन्यातील सुट्टया प्रमाणे एप्रिलच्या पहिल्याच पंधरवड्यात वातावरण पहायला मिळत होते. रविवारी (ता. ९) पहाटेला संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी भक्तांना खुले करण्यात आले. पहाटेला श्रींची नेहमीप्रमाणे पुजा, सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आली. यावेळी देवस्थानचे प्रमुख पुजारी, सरपंच यांच्यासह अनेक भक्तगण सहभागी झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील भक्तांची मोठी गर्दी दर्शनासाठी होती. त्या पाठोपाठ मुंबई, पुणे आणि अन्य जिल्ह्यातील लोकांचा समावेश होता.
शुक्रवारी (ता.७) गुडफ्रायडेला शासकीय सुट्टी होती. त्यानंतर जोडून शनिवार आणि रविवार असे दोन सुट्टीचे दिवस आले. त्याचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच झाला. मुंबई, पुण्यासह बहुसंख्य पर्यटकांची पावले आपसूकच कोकणातील किनाऱ्यांकडे वळलेली होती. दोन दिवस मुक्काम करुन रविवारी अनेकानी गणपतीपुळेत संकष्टीला हजेरी लावली. शुक्रवारी आणि शनिवारी मंदिरामध्ये सुमारे १३ हजार पर्यटकांची दर्शनासाठी नोंद झाली तर रविवारी सोळा हजाराहून अधिक भक्त दाखल झाल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
दरवर्षी पर्यटन हंगाम मे महिन्यात सुरु होतो. या कालावधीत देश- विदेशातील पर्यटकांची कोकणासह गणपतीपुळे पर्यटनस्थळी गर्दी होते. याचा फायदा किनाऱ्यावरील फेरीवाले, हॉटेल व्यावसायीक, लॉजिंग व्यावसायीक यांना होतो. दि. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत गणपतीपुळेतील पर्यटकांची गर्दी येथील व्यावसायीकांसाठी आश्वासक ठरली. परिक्षांचा कालावधी असला तरीही किनाऱ्यांवर मुलांचा राबता दिसत होता. दुपारी उन्हाचा कडाका असला तरीही समुद्रफेरीसाठी पर्यटकांकडून प्राधान्य दिले जात होते. किनाऱ्यावर घोडे, उंट आणि गाडीतून सवारी करण्यासाठी पर्यटकांची पावले वळत होती. उन्हामुळे नारळपाणी यासह थंड पेयांकडे कल होता. जोडून सुट्ट्यांमुळे काही प्रमाणात पर्यटक निवासासाठीही आले होते.गणपतीपुळे किनाऱ्यावर समुद्रात पर्यटकांनी फिरवण्यासाठी दाखल झालेली ड्रॅगन बोट यंदाच्या हंगामातील आकर्षण ठरत होती. यापुर्वी बनाना बोटीचे आकर्षण होते. त्याहीपेक्षा ही बोट मोठी आणि त्यामधून फिरताना तेवढेच सुरक्षित वाटत असल्यामुळे त्यामधून फिरण्यासाठी सरसावत होते.