स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच दापोली तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यात सगळीकडेच दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील जाण्या येण्याचे मार्ग बंद पडण्याच्या घटना घडल्या. केळशीमध्ये उभागर आळीत पावसाचे पाणी भरल्याने रहिवासी घरातच अडकून पडले होते. दापोली तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असलेल्या केळशी येथील उभागर आळीत पाणी भरल्याने येथील रहिवाशांना आपल्या घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. शिवाय उभागर आळीतून पुढे मार्गस्थ होण्यासाठी केळशी बापू आळी, वरचा डूंग तसेच खालच्या डुंगातील काही भागातील रहीवाशांना या मार्गावरून प्रवास करणे गैरसोयीचे झाले. केळशी गावात उभागर आळी आहे. या उभागर आळीतूनच श्री. महालक्ष्मी मंदिराकडे येण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून पी.डी. विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळेत यावे लागते. तसेच उटंबर चिंचवळ वाडीकडे आणि याकुबबाबा दर्याकडे जाणारा सुध्दा हाच मार्ग आहे.
तर दुसरा मार्ग श्रीराम मंदिर, साठेआळी, गुजरवाडा तसचे बाजारपेठेत जाणारा मार्ग आहे. त्याचप्रम ाणे तिसरा मार्ग हा श्री. गोखले यांच्या घराकडून कुंभारवाडा, आतगाव भाट तसेच बाजारपेठेत जाणारा मार्ग आहे आणि चौथा मार्ग हा बापू आळी वरचा डूंग खालचा डुंग भगत आळीकडे येण्यासाठीचा एकमेव असा मार्ग आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने उभागर आळीत पाणी भरल्याने उभागर आळीतील रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला होता. त्यामुळे तेथील लोकांची तर गैरसोय झालीच. शिवाय उभागर आळीत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांच्या अंगणात पाणी भरले होते. भरलेलं पाणी कधी ओसरते याची वाट बघण्यापलीकडे येथील रहिवाशांकडे पर्याय नव्हता.
गुरूवारी सायंकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे येथील नागरिकांचा उर्वरित गावांशी, बाजारपेठेशी संपर्क तुटला. तेथे जाण्यासाठी त्यांना दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. पाणी ओसरेपर्यंत त्यांना वाट पाहण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. केळशी उभागर आळीतील स्थानिक रहिवाशांची पावसाळ्यात रस्त्याअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी ही महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी केली जात आहे.