शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बदललेली भूमिका या पार्श्वभूमीवर पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ताकद लावत आहेत. त्यांचे कोकणात सतत दौरे सुरू आहेत. त्यांना आगामी निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी त्यांना जादुई नेत्यांची गरज आहे. त्या पातळीवर त्यांना अजून सूर गवसलेला नाही. त्यांच्या संपर्कातील बहुतांश प्रमुख नेते स्थिर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाली आहे. अडीच वर्षात चार प्रमुख पक्षाचे तुकडे होऊन सहा पक्ष झाले आहेत. प्रमुख नेत्यांना कुठे ना कुठे संधी मिळणार आहे. त्यामुळे नवा प्रयोग करण्याची मानसिकता या घडीला तरी कुणाची दिसत नाही; मात्र राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे सामान्य जनतेला राजकीय लोकांबद्दल एक प्रकारची चीड निर्माण झाली आहे.
या घाणेरड्या राजकारणात लोकांनी मनसेला पर्याय म्हणून निवडावा यासाठी राज ठाकरेंचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह, रंग बदलले आणि ओळखही बदलली. त्यांच्या कोकणदौऱ्यात राज ठाकरे म्हणजे हिंदूरक्षक आणि धर्मरक्षक अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले. कोकण म्हणजे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील हिंदुत्ववादी लोकांची मते आतापर्यंत शिवसेनेला मिळत होती; मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलल्यानंतर कोकणातील शिवसेनेची मते आपल्याकडे यावीत यासाठी राज ठाकरेंचे प्लॅनिंग आहे.
अलीकडे त्यांनी उत्तर रत्नागिरी भागाचा दौरा केला. मनसेची ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे. त्या त्या ठिकाणी त्यांच्या दौऱ्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते. चौकाचौकात त्यांनी स्वागत स्वीकारले. मंडणगडसारख्या दुर्गम भागाचा त्यांनी दौरा केला. शिवसैनिकांनी मनसेला पर्याय म्हणून स्वीकाराला असेच काहीसे चित्र त्यांच्या दौऱ्यातून दिसत होते.