महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. आता स्वराज्य स्थानिक आगामी संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते. यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती राज़ ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही.
या भेटीला राजकीय स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती, असे उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणाची शैली आणि त्यांचे वकृत्व वेगळे आहे. राज ठाकरे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित युतीमध्ये येणार का हे माझ्यासाठी फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरील चर्चेत मी कधी पडलो नाही. माझ्या आवाक्यातील आणि झेपतील असे प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. दरम्यानं सारा मामला फार ‘गंभीर’ आणि ‘गहन’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.