गेले काही दिवस ज्यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा रत्नागिरीच्या राजकारणात सुरू होती ते राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आता गुरूवारी १३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान राजन साळवींच्या या निर्णयाने रत्नागिरी जिल्हयाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राजन साळवी शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत होते, पराभवाचं खापर आमच्या माथ्यावर फोडून ते जात आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे – गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात शिवसेना ठाकरे गटाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता उपनेतेपदाचा राजीनामा देत राजन साळवींनी एक मोठा धक्का उध्दव ठाकरेंना दिल्याचे बोलले जात आहे.
तर यामुळे कोकणात शिवसेना शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा जोर धरत आहे. बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळापासून रंगली होती. भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत मात्र साळवींनी थेट बोलणे टाळले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे ते म्हणत होते. मात्र आता ते शिवसेनेचा (शिंदे गट) झेंडा हाती घेताना दिसत आहेत.
अग्रगण्य जिल्हाप्रमुख – राजन साळवी हे कोकणातील शिवसेनेचे एक जेष्ठ नेते होते. त्यांनी नगरसेवक पदापासून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदही त्यांनी भूषविले. राज्यातील अग्रगण्य जिल्हाप्रमुख असा किताब त्यांना दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. शिवसेनेच्या माध्यमातून राजापूर-लांजा विधानसभा मतदारंसघातून ते ३ वेळा विधानसभेवर निवडून आले. त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात प आले होते. बुधवारी या पदाचा त्यांनी राजीनामा दिला.
आज दुपारी प्रवेश – ठाकरेंची साथ सोडणारे माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारं असल्याचे बोलले जाते. गुरूवारी १३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ठाण्यामध्ये आनंदाश्रम ात ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश करतील अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. अर्जन साळवींच्या आजच्या राजीनाम्याने ती खरी ठरल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी दुपारी १. वाजता मुंबईतील सिडको भवन येथून राजन साळवी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या दिशेने निघणार असून शिवसेनेच्यावतीने ठाण्यात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
विधान परिषदेवर संधी? – राजन साळवी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. ‘माझ्या पराभवाला – कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. जो दुःखाचा डोंगर पक्षावर, माझ्या कुटुंबावर कोसळला, त्याला कारणीभूत कोण हे शोधणं गरजेचं आहे. माझ्यावर जी वेळ आली आहे त्ती भविष्यात अन्य कोणावर येऊ नये, यासाठी वरिष्ठ नेतृत्त्वाने योग्य निर्णय घ्यायला हवा. पराभवाला कारणीभूत कोण आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे,’ असं साळवी म्हणाले होते. मात्र आता त्यांच्या पक्षांतराच्या बातमीने त्यांच्या नाराजीला वाट मिळाल्याचे दिसते.
निमित्त शोधत होते – दरम्यान माजी आमदार राजन साळवी यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी फटकारले आहे. ‘विधानसभेत पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच साळवींनी भाजपा प्रवेशाची चाचपणी सुरू केली होती. ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न करत होते. मला असं वाटतं की त्यांना बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं. पराभवाचं खापर त्यांना कोणावरतरी फोडायचं होतं. त्यामुळे पराभवाचं खापर माझ्यावर आणि अन्य सहकाऱ्यांवर ते फोडत आहेत, अशी टीका ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केली आहे.