उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी (ता. २) उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यामध्ये आणखी एक धक्का बसला आहे. तेली यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळी ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना तब्बल तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर ते काहीसे राजकीय अज्ञातवासात गेले होते. ठाकरे शिवसेनेच्या कुठल्याच कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी होत नव्हते, तसेच त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे राजकीय स्टेटमेंट दिले जात नव्हते. ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, यातही राजकीय अडचणी आल्याचे समजते.
गेल्या आठवड्याभरात जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणावरून ते चर्चेत आले होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करत एक प्रकारे पुन्हा एकदा राजकीय धक्का दिला आहे. तेली यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सोबतच जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेची ताकद काहीशी वाढणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष असताना संघटना बांधणीचे काम केले होते; परंतु गेल्यावेळी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपची साथ सोडली होती. ठाकरे शिवसेनेत जात त्यांनी उमेदवारी मिळवली होती. मात्र, तेथे त्यांचे संघटनात्मक काम दिसले नाही. असे असले तरी गावोगावी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्याचा शिंदे शिवसेनेला फायदा होणार आहे.