राजापूर नगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह डाटा ऑपरेटरना संबंधित ठेकेदार कंपनीकडून मार्चचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १५) कामबंद आंदोलन पुकारले. कामबंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे या विभागांशी निगडित असलेले नगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले. राजापूर नगर्पालिकेकडून बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह चालक व डाटा ऑपरेटर यांसारखे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. यासाठी डी. के. नामक ठेकेदार कंपनीला तीन वर्षापूर्वी ठेका देण्यात आलेला आहे. या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नाही. जे वेतन दिले जाते तेही वेळेत दिले जात नाही, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांसमवेत केलेल्या करारामध्ये नगर पालिकेकडून वेळेत जरी निधी उपलब्ध झाला नसला तरी आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार करू, असे लिखित आश्वासित केलेले असतानाही संबंधित ठेकेदार कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे पगार थकवले जात आहेत.
निम्मा एप्रिल महिना संपला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदार कंपनीकडून पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज नगर पालिकेला निवेदन देत कामबंद आंदोलन छेडले. वेळेमध्ये पगार मिळत नसल्याने घरखर्चासह बँकेच्या कर्जाच्या हप्त्यासह घेण्यात आलेली उसनवार नेमकी भागवायची कशी? असा सवाल या निवेदनाच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगार थकीतप्रकरणी पुकारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे, रवींद्र बावधनकर यांनी नगरपालिकेवर धडक दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तत्काळ पगार व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे तत्काळ पगार देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नोटीसही देण्यात आल्याची माहिती नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी दिली. दरम्यान, नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले होते.