रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनामुळे खिळखिळीत झालेली आरोग्य यंत्रणा ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने अजूनच गंभीर अवस्थेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजापूर ओणी येथील कोविड रुग्णालयामधील एक वैद्यकीय अधिकारी यांनी राजीनामा दिला असून आणी उर्वरीत ३ वैद्यकीय अधिकारी १८ जुलै नंतर काम पाहणार नाहीत असे सांगण्यात आल्याने आरोग्य विभागाची अवस्था खूपच हालाखीची झाली आहे.
राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार तसेच ओणी येथील कोविड रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार काढून घ्यावा, नाहीतर मलासुद्धा राजीनामा द्यावा लागेल असे वक्तव्य राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी केल्याने राजापुरात पेच निर्माण झाला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी त्यामुळे २४ तास आपणावर कामाचा प्रचंड ताण निर्माण होतो. तसेच एवढी सगळीच जबाबदारी एकट्याच्या अंगावर असल्याने मानसिक दडपण मोठ्या प्रमाणत मला जाणवत असल्याने, आपल्याकडील राजापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा भार काढून घ्यावा, एवढ्या अपुर्या मनुष्यबळावर दोन रुग्णालये काय, एक सुद्धा चालविणे मला शक्य नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहे.
ओणी येथील कोविड रुग्णालयातील चारपैकी एक वैद्यकीय अधिकार्याने राजीनामा दिला असून तो ७ जुलैला मंजूर करण्यात येऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित ३ वैद्यकीय अधिकार्यांनी १८ जूनला राजीनामा पत्र दिले असून, १८ जुलैनंतर कामकाज आम्ही पाहणार नाही असे कळविले आहे. त्यामुळे असलेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी डॉ. मेस्त्री यांनी या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि आम. राजन साळवी यांनासुद्धा दिल्या आहेत.