रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच उभारणार, असे स्पष्ट प्रतिपादन राज्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना केले आहे. त्यामुळे आता रिफायनरीच्या समर्थनार्थ अनेक पक्ष एकत्र येण्र्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात रिफायनरी समर्थनार्थ सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने रविवार ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
रिफायनरी प्रकल्पाबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्याने राजापूर धोपेश्वर येथील यशोदिन गार्डन हॉल येथे दुपारी ३ वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे. राजापूर नाणार व लगतच्या गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना मोठ्या विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधानंतर शासनाने रद्द केल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर जाता कामा नये याकरीता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उठाठेवी सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत.
अशातच शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. सेना खासदार विनायक राउत यांनी सुद्धा जिथे विरोध होणार नाही अशा जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांवर हा प्रकल्प लादण्यात येणार नाही आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार सर्व पक्षांच्या समर्थकांनी केला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने का असेना पण कोकणच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे आणि समर्थन दर्शविणे गरजेचे आहे.