रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळपासून तुफानी पडणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. एक दिवसाचा ब्रेक घेऊन संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरण्याच्या स्थितीत असल्याने नगर परिषदेने धोक्याच्या सूचना देणारा सायरन वाजवून नागरिकांना पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या अनेक घरांना गरज पडली तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यास सांगितले आहे.
सोमवारी सकाळी पुराच्या पाणी पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये शिरल्याने, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे, पाण्याने जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिलेला. त्याच दरम्यान, पुराच्या पाण्यातुन रायपाटण गांगणवाडीमध्ये पुलावरुन जाणारे एक वृध्द व्यक्ती वाहुन गेली असल्याची घटना घडली असून बेपत्ता वृद्धाचा शोध घेणे सातत्याने सुरु आहे. रायपाटण गांगणवाडी येथुन पुराच्या पाण्यात वाहुन गेलेले. विजय शंकर पाटणे वय ७० हे मूळ खेड तालुक्यातील असून, ते गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते अर्जुना नदी किनारी गेले असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील तर शहरातील शिवाजी पथ मार्गावर पाणी आल्याने नगर परिषदेने सुरक्षा बोट तैनात ठेवली आहे. धाऊलवल्ली-आंबेलकरवाडी हा मुख्य रस्ता खचला आहे. नाटे ठाकरेवाडी येथे वाहळावरून पाणी गेल्याने ठाकरेवाडीचा संपर्क तुटला आहे. तर शिळ-चिखलगाव मार्गावर पुन्हा एकदा पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद पडला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेमध्ये शिरायला लागल्याने, जवाहर चौकाकडे जाणारी एस.टी वाहतुक सेवा बंद करण्यात आली आहे.