प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी शासन स्तरावरून राजापूर तालुक्याचे विभाजन करून नव्या रायपाटण तालुका निर्मितीच्या अनुषंगाने रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील राजापूर पूर्व भागामध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेली कित्येक वर्ष ग्रामस्थ्यांच्या मागणीला यश मिळत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. लवकरच कार्यालय निर्मिती झाल्यास शेतकरीवर्ग व वृद्ध ग्रामस्थ्यांना आपली कामे जवळच्या अंतरात करणे सोईचे होणार आहे. प्रशासन गतिमानतेसाठी राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि ६९ अतिरिक्त तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. वाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वोढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ६ महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती. तर नव्या अतिरिक्त तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासह संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयांपासून तालुक्यांतील सर्वांत दूरच्या गावांचे अंतर तसेच प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करताना राजापूर तालुक्याचे विभाजन करून रायपाटण या नव्या तालुक्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव असून तसे झाल्यास विभाजनामुळे राजापूर तालुक्यातील जनतेची मोठी सोय होणार आहे.

