प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या ‘जवान’ या हिंदी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानसह नकारात्मक भूमिका साकारणारे विजय सेतुपती यांचे नेपथ्य करण्याची संधी राजापूरचे सुपुत्र भूषण रहाटे यांना मिळाली. ‘डा मेकअप लॅब’ कंपनीत नोकरी करत असलेल्या भूषणने चित्रपटातील शाहरुखच्या चेहऱ्यावरील ‘सिलिकॉन रबर मास्क’ तयार केला आहे. केवळ या चित्रपटामध्ये नव्हे तर त्याने यापूर्वी त्याने ‘गंगूबाई काठीयावाडी, पुष्पा’ आदी नामवंत चित्रपटांसाठीही असे मास्क बनवलेले आहेत. त्यामुळे भूषण यांनी राजापूरच्या कला-कौशल्याची मुद्रा बॉलिवूडमध्ये उमटवली आहे.
शहरातील कोंढेतड येथील रहिवाशी भूषण यांचे राजापूर हायस्कूलसह नवजीवन कॉलेजमध्ये शिक्षण झाल्यानंतर पुढे राजापूर आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकलचेही शिक्षण घेतले. नाशिक येथे महिंद्रा कंपनीमध्ये दोन वर्षे शिकाऊ म्हणून केल्यानंतर, घरचा ट्रक व्यवसायही त्यांनी काही वर्षे सांभाळला. मात्र, अंगी कलाकौशल्य गुण असलेल्या भूषणचे मन त्यामध्ये फारसे रमले नाही. पुढे त्यांनी गुहागर येथील मावसभाऊ स्वप्नील झगडे यांच्या मुंबईतील कारखान्यामध्ये मोल्डर, वेल्डर म्हणून काम केले.
तेथे विविध कलाकौशल्याची कामे त्यांना करावयास मिळाली. त्या ठिकाणी मिळालेल्या अनुभवामुळे भूषण सध्या ‘डा मेकअप् लॅब’ कंपनीत नोकरीला लागले. या साऱ्या प्रवासामध्ये आई-वडील, स्वप्नील झगडे, अविनाश शिवशरण, डी मेकअप् लॅबचे प्रमुख प्रितीशील सिंग डिसुझा, मार्क डिसुझा यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे भूषण सांगतात.
असा बनवतात मास्क – सर्वप्रथम संबंधित अभिनेत्यांचा लाईव्ह कास्ट घेतला जातो. त्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर रबर ओतून त्याचा साचा बनवतात. त्या साच्यामध्ये पीओपी ओतून त्याच्या चेहऱ्याचा पुतळा (स्टॅच्यू) तयार केला जातो. मग त्या चेहऱ्याचा मास्क करायचा असेल तर कलाकार विशिष्ट प्रकारच्या मातीपासून संबंधित मास्क तयार करतात. त्यानंतर, पुन्हा त्या मास्कचा साचा तयार केला जातो. त्यानंतर त्या साच्यामध्ये सिलिकॉन ओतून रबरचा (सिलिकॉन रबर) मास्क तयार केला जातो. त्याच्यावर पेंटिंग करून तो मास्क अभिनेत्याच्या चेहऱ्यावर लावला जातो. दहा ते पंधरा दिवसांमध्ये हा मास्क तयार केला जात असल्याची माहिती भूषण रहाटे यांनी दिली.