चिपळूण प्रांत कार्यालयासमोर मागील ५ दिवसापासून सुरु असलेले साखळी उपोषण आता सगळीकडेच चर्चिले जात आहे. जुलै महिन्यात ओढवलेली महापुराची भीषण परिस्थिती लक्षात घेता, पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी, नद्यांचा गाळ उपसा करणे आवश्यक आहे. मागील ५० वर्षात नद्यांमधील गाळ उपसलेलाच नसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.
नागरिकांच्या उपोषणाची दखल घेऊन माजी खासदार माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दि. १० डिसेंबर रोजी सकाळी भेट दिली. त्यांच्याबरोबर शेतकरी संघटनेचे इतर नेतेही होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार हे आपल्या कार्यकर्त्यांसह या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी चिपळूणात दाखल झाले आहेत. कोकणातील नेत्यांनी त्याचबरोबर राज्यस्तरीय नेत्यांनीही आता या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपले परखड मत व्यक्त केले कि, पूरग्रस्तांना मदत करताना सरकार कायम हात आखडता घेत, मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा ओतला जातो. तिथे कधीच शासकीय निधीची कमतरता भासत नाही. आणि इथे चिपळूणच्या नद्यांच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषणाला बसावे लागत आहे, हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आता खर्च वाटत पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली आहे. राजकारण आणि द्वेष बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल उपोषणकर्त्यांना भेट घेतली तेंव्हा सोबत चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, शिरीष काटकर, अरूण भोजने, सतीश कदम यांनी या साखळी उपोषणामागील हेतू स्पष्ट केला.