विधान परिषदेत केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी दिशाभूल करणारे आणि बेछूट आरोप करणारे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवावा, असे खुले आव्हान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले आहे. अनिल परब यांनी विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून, त्याबाबत येत्या दोन दिवसांत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे रामदास कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. रामदास कदम म्हणाले, योगेश कदम यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे असून, जर ठोस पुरावे असतील तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावे. अन्यथा ‘बाप दाखव नाहीतर श्रद्धा घाल’, हे लक्षात ठेवावे. कदम यांनी परब यांच्यावर निशाणा साधत सांगितले की, विधीमंडळात काम करण्याचा मला ३५ वर्षांचा अनुभव आहे. अनिल परब यांचा वकीलीचा अभ्यास कमी आहे.
कोणत्याही मंत्र्यावर आरोप करताना नियमानुसार ३५ क्रमांकाची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घ्यावी लागते. मात्र, गृहराज्यमंत्री सभागृहात अनुपस्थित असताना परब यांनी सरळ आरोप करून विधान परिषदेच्या कार्यपद्धतीचा भंग केला आहे. डान्स बार सुरू करून लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारे आम्ही नाही, उलट आम्ही डान्स बार फोडणारे आहोत. मी आणि माझे कुटुंबीय जिवंत आहोतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग लावून घेणार नाही, असे ठामपणे सांगताना,राज्यातील सर्व डान्स बार बंद करण्याबाबत आपणच गृहराज्यमंत्री योगे कदम यांना सूचना दिल्याचेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. या राजक आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावर अधिकच तापण्याची शक्यता आहे.