आज सकाळी राणा दाम्पत्य मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहे. ते दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईची तक्रार दिल्लीत करणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राणा म्हणाले, पोलिसांचा वापर करून आमच्यावर अत्याचार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून माझ्या फ्लॅटची पाहणी करावी. त्यामध्ये काही समस्या येत असेल तर संजय राऊत आणि अनिल परब यांना पाहणीसाठी पाठवावे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत की नाहीत, अशी सध्या राज्याची परिस्थिती झाली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रथम स्वत: फ्लॅटच्या कागदपत्रांची तपासणी करावी. आम्हाला खार पोलिस ठाण्यात पहाटे ५ वाजेपर्यंत पाणी देखील दिलं गेलं नाही. खार पोलिस ठाण्यात सतरंजीही देण्यात आली नाही. पोलिस ठाण्यात अनेक तास उभं राहावं लागलं. मुख्यमंत्र्यांच्या सुरु असलेल्या दडपशाहीची तक्रार दिल्लीमध्ये करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. हनुमान चालिसाचा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी आमच्या मुंबई व अमरावतीतील घरांवर हल्ला करवला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला २० फूट जमिनीत गाडण्याची भाषा केली. त्यासोबतच आमचे स्मशानभूमीत सामान पोहोचवल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.
राणा दाम्प्त्याने जामिनाच्या प्रमुख अटीचे उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला मिळालेला जामीन रद्द करावा, यासाठी आज कोर्टात अर्जदेखील करणार असल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले होते. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही.