कोकणामध्ये भात शेती हि प्रामुख्याने केली जाते. त्यासोबतच आंतरपिके म्हणून विविध प्रकारची पिके घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे शेती हि आत्ता बारमाही प्रकारात होत असून, शेतकरी अद्ययावत पद्धती वापरून उत्पादन वाढीचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या देखील अनेक सुविधा उपलब्ध असून, त्यांचा लाभ सर्व शेतकऱ्याना मिळावा यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेती क्षेत्र कमी आहे त्यांची समूह शेती करून, सरकारी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केले आहे.
कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या ८५ टक्के आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी समूह शेतीला प्रोत्साहन द्यावे, तसेच खरीपासोबत रबी हंगामातही अधिक क्षेत्र पेरणीखाली येईल, असे नियोजन करा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिल्या. जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ बी.एन.पाटील यांनी देखील कोकणातील शेतीपूरक वातावरण पाहून, अनेकदा जनतेला संबोधून जास्तीत जास्त सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
२०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाचा आढावा त्यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. एक एकर किंवा त्याहून कमी शेती असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ देणे शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर समूह शेती महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील आमदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.