चिपळूण येथील बनावट नोटांचे कनेक्शन थेट रत्नागिरीशी असल्याचे उघड झाले आहे. चलनात येणाऱ्या बनावट नोटा रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील प्रसाद प्रिंटर्स येथे छापल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने प्रसाद प्रिंटर्सचा मालक प्रसाद राणे याला रत्नागिरीतून अटक केली आहे. त्याने जंगलात फेकून दिलेले प्रिंटिंग मशीन पोलिसांनी जप्त केले आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक अमित कासार याने पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का, याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहे.
गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (वय ५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०) आणि ऋषिकेश निवलकर (२६) यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव पुढे आले. कासारच्या चौकशीतून एका वकिलालाही अटक केली आहे. त्या पाठोपाठ प्रसाद राणेला रत्नागिरीतून अटक केली. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट नोटांप्रकरणी अटकसत्र सुरू झाले. त्यानंतर राणेने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकून दिले होते.
ही मशीन गुन्हे शाखेने जप्त केली आहे. २५ हजारांच्या बनावट नोटांवर १० ते १५ हजारांचे कमिशन देत या नोटा चलनात आणल्या जात होत्या. यामध्ये कासार हा पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक असल्याने त्याला हाताशी घेत हे रॅकेट सुरू होते. कासारची ३१ जुलैला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून काही उलाढाल केली आहे का, याबाबतही राणेकडे चौकशी सुरू आहे. त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष १०चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सावंत, पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश तोडकर, धनराज चौधरी, पोलिस अंमलदार चिकने आणि डफळे यांनी ही कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यापासून चिपळूण, रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात पूरस्थिती असतानाही मुंबई, रत्नागिरी, चिपळूण असा वारंवार प्रवास करून गुन्हेशाखेने आरोपींचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.