24.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriजिल्ह्यात लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाला विशेष सूचना – जिल्हाधिकारी रत्नागिरी

जिल्ह्यात लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाला विशेष सूचना – जिल्हाधिकारी रत्नागिरी

जिल्ह्या बाहेरून कोणतीही जनावरे जिल्ह्यामध्ये आणली जाणार नाहीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी पशुपालकांनी विशेष खबरदारी घेऊन आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांनी जिल्ह्या बाहेरून कोणतीही जनावरे जिल्ह्यामध्ये आणली जाणार नाहीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

लम्पी हा आजार विषाणूजन्य असून तो संसर्गजन्य आहे. त्यामुळे याची लागण झाल्यास तो इतर जनावरांपर्यंत पसरण्याचा धोका आहे. गुरांना चावणारे गोमाशा, गोचिड, डास यामुळे लम्पी आजार पसरतो आहे. गोठ्यामध्ये किटकनाशकांची फवारणी करणे, गोठ्याची स्वच्छता राखणे, गोठ्यामध्ये औषधी धुरी करणे यामुळे या आजाराला प्रतिबंध होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा करण्यात येत असून, जनावरांना सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत, अशी माहिती यादव यांनी दिली आहे.

तसेच पशुपालकांनी जनावरांमध्ये या आजाराची किंवा इतर कोणत्याची आजाराने जनावर आजारी असेल तर, वेळीच लक्षणे ओळखून तालुका पशुसंवर्धन विभाग अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि जनावरांवर तत्काळ उपचार करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये पाळीव जनावरांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने, ग्रामपंचायतीमार्फत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, रत्नागिरी पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार बाबर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. व्ही. व्ही. पनवेलकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत देसाई आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular