रत्नागिरी प्राथमिक शिक्षक सेना होणाऱ्या अनियमित पगारामुळे त्रस्त झाले असून, पगार वेळेवर मिळावेत यासाठी अनेकदा निवेदन देऊन सुद्धा बऱ्याचदा तांत्रिक अडचणीच्या नावाखाली पगार विलंबाने होत आहेत. त्यामुळे यंत्रणेला जाग आणण्यासाठी दि. ८ जून रोजी सर्व शिक्षक संस्था मिळून जि.प. रत्नागिरी समोर घंटानाद आंदोलन छेडणार होते.
जानेवारी २०२२ पासून तांत्रिक कारण सांगून प्राथमिक शिक्षकांचे पगार उशिराने होत असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती आणि असंतोष होता. याच कारणामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेना रत्नागिरी जिल्हा परिषद समोर बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता बेमुदत घंटानाद आदोलन करणार होती.
हे घंटानाद आंदोलन स्थगित करावं यापुढे शिक्षकांचे पगार वेळेवर करु असे सांगत मा.शिक्षणाधिकारी वामन जगदाळे शिक्षक यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना यांनी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी पगाराची बिले कोषागार कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवली असून १०जून पर्यंत पगार होतील आणि या पुढील पगार दर महाच्या ७ तारखेपर्यंत होतील असे लेखी पत्र शिक्षक सेनेला दिले असल्याने मा.शिक्षणाधिकारी यांच्या या लेखी पत्रावर विश्वास ठेवून शिक्षक सेनेने ८ जून रोजी पुकारलेले घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देवळेकर यांच्यासोबत श्री.सुरेंद्र रणसे (जिल्हा सरचिटणीस) श्री.दिपक कदम (जिल्हा सहसचिव) श्री.राजेश पवार (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख)श्री.शशिकांत कारंडे (संगमेश्वर तालुका कोषाध्यक्ष )हे तर प्रशासनाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्री.जगदाळे साहेबांसोबत श्री संदेश कडव (उपशिक्षणाधिकारी) श्री.बेर्डे (अकाउंटंट)आदींची उपस्थिती होती.