एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसमितीने स्पष्ट केले आहे, तरीही एसटी कर्मचारी अजून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. १० मार्च पर्यंत कामावर हजर होण्याच्या सूचना महामंडळ प्रशासनाने दिल्या होत्या. त्या कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे. त्याचा फायदा घेऊन काही कर्मचारी हजर होण्यास तयार असल्याचे समजते. गेल्या पाच दिवसांमध्ये रत्नागिरी मधील ५७ कर्मचारी हजर झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली.
एसटी संपाला चार महिने होत आले तरी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडून कर्मचारी बंद मागे घेऊन कामावर हजर होतील, अशी अपेक्षा होती; परंतु एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. महामंडळाने देखील आता कठोर भूमिका घेत बंदमध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना १० मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. तशी नोटीस काढली असून, हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
दरम्यान, विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडत असल्याचे पाहून गेल्या पाच दिवसांमध्ये ५७ कर्मचारी हजर झाले आहेत. यामध्ये चालक १२, वाहक ८, चालक कम वाहक २१, कार्यशाळेतील ७ तर प्रशासनातील ९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एकूण कर्मचारी ३ हजार ४४७ आहेत. त्यापैकी ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. १२ कर्मचारी गैरहजर आहेत. १७१ साप्ताहिक सुटी, रजेवर आहेत तर २ हजार ५७५ कर्मचारी अजूनही गैरहजरच आहेत. त्यामुळे लवकरच रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातील एसटी वाहतूक सुरु होईल अशी लक्षणे दिसून येत आहेत.