ई-पॉस मशीनवर अंगठा मॅच झाला नाही, तुम्हाला धान्य मिळणार नाही, असे म्हणण्याची वेळ आता रास्त धान्य दुकानदारांना येणार नाही. कारण, बेस फोरजी पॉस मशीन प्रत्येक रेशन दुकानात दिली आहे. यामध्ये आयस्कॅनरची (डोळे स्कॅन) सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्याची सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था हायटेक झाली असून, एकही लाभार्थी आता रेशनपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्याची सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. नागरी व पुरवठा मंत्रालयाकडून सर्व रास्त धान्य दुकानदारांना बेस फोरजी पॉस मशीन दिली आहे.
यापूर्वी देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. त्यामुळे त्याबाबत लाभधारकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यावर जिल्हा पुरवठा विभागाने अनेक उपाय योजना केल्या. तरी अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहात होते. त्यात ई-पॉस मशीन मुदतबाह्य झाल्यामुळे त्या जमा करण्यात आल्या होत्या. त्या बदल्यात नवीन बेस फोरजी पॉस मशीन पुरवण्यात आल्या. अनेकवेळा वयोवृद्ध लाभार्थीच्या हातांचे ठसे जुळत नाहीत. त्यामुळे पॉस मशीनवर आधारकार्ड देऊन धान्य घेताना अनेकदा अडचणी येऊ लागल्या असून, धान्यापासून काहीवेळा वंचित राहावे लागत होते; परंतु आता डोळे स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली असल्याने सर्व कार्डधारकांना धान्य मिळणार आहे.