रत्नागिरी Ratnagiri या नावातच काहीतरी भव्यदिव आहे! या भूमीचं प्रत्येक वैशिष्ट्य त्या भव्यदिव्यतेची साक्ष देणारं आहे. प्रत्येकाच्या मनात आणि स्वभावात रत्नागिरीकर असणं भिनलेलं आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगरदऱ्या यांनी वेढलेली रत्नागिरी इथल्या आतिथ्यशील माणसांमुळे आणि कष्टांमधून सोनं पिकवणाऱ्या लोकांमुळे इथे येणारांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतात. या भूमीने लेखक, कवी यांना नेहमीच भुरळ पाडलेली आहे आणि त्यांच्या साहित्यात इथल्या प्रत्येक वैशिष्ट्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे.
Table of Contents
काय आहेत रत्नागिरीची वैशिष्ट्ये ? | Ratnagiri
नाना जाती-पंथांचे लोक, त्यांच्या विविध बोली भाषा, इथली शेती, उद्योगधंदे, इथली कला, लोकांचं नाट्यप्रेम, इथलं निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळं बागबागायती, इथली खाद्यसंस्कृती, इथल्या शैक्षणिक संस्था अशी हाताच्या बोटांवर न मोजता येणारी वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या रत्नागिरीची शान आहे. देश-विदेशातल्या लोकांना या भूमीचं नेहमीच आकर्षण आणि कौतुक वाटत राहिलं आहे.
कागदोपत्री रहाटागर या नावाने ओळखलं जाणारं गाव रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि साधारण तीस वर्षांपूर्वी कौलारू घरांची दाटीवाटी असलेलं शहर होतं. आज इथे अनेक गृहनिर्माण संस्थांनी बांधलेल्या बहु मजली इमारतींचं जाळं पसरलं असून अनेक व्यापारी संकुलं सुद्धा इथे बांधण्यात आली आहेत.

उद्योग व्यवसाय | Industry’s in Ratnagiri
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत अनेक छोटे मोठे उद्योगधंदे इथे विकसित झाले आहेत.त्यामुळे आसपासच्या अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आसपासच्या गावांमधून शेती, बागायती आणि भाजीपाला उत्पादन तसंच दुग्धव्यवसाय करणारा वर्ग आहे ज्याद्वारे रत्नागिरीतल्या लोकांना या उद्योगातून तयार झालेला शेतमाल उपलब्ध होतो. व्यापारी तत्वावर फुलझाडांची शेती करणारे काही लोकही रत्नागिरीच्या जवळपास आहेत. रत्नागिरीचा हापूस आंबा अवघ्या जगात प्रसिद्ध आहे आणि ह्या आंब्यांपासून अनेक प्रक्रिया उद्योग इथे विकसित झाले आहेत. वर्षभर ह्या ना त्या स्वरूपात आंब्याचा आस्वाद घेता येईल अशी सोय त्यामुळे उपलब्ध आहे. आंब्याच्या बरोबरीने काजू हे आणखी एक नकदी पीक इथे घेतलं जातं आणि काजूप्रक्रिया हाही हे उद्योग इथे नावारूपास आलेला आहे.
रत्नागिरीचाच एक भाग असलेलं मिऱ्याबन्दर हे मत्स्योत्पादनाचं प्रमुख केंद्र असून त्यातूनही अनेक उत्पादनं घेणाऱ्या उद्योगांना इथे चालना मिळालेली आहे. बेकरी उद्योगही रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणी उत्तम प्रकारे विकसित झाला असल्याने बेकरी उत्पादनंसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात.
पर्यटन | Tourism in Ratnagiri
शिवछत्रपतींच्या काळात बांधला गेलेला रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती बंदर हे इथे येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात.रत्नागिरी शहरातल्या सुप्रसिद्ध मधल्या आळीत लोकमान्य टिळक जन्मभूमीचं जतन केलं असून अनेक टिळकप्रेमी इथे येऊन हे ठिकाण पाहून जातात. मांडवी बंदर, भाट्ये समुद्रकिनारा, मत्स्यालय, थिबा राजवाडा, भैरी मंदिर, भागेश्वर मंदिर, पतितपावन मंदिर आणि त्याच परिसरात असलेलं स्वातंत्र्यवीर सावकारांचा जीवनपट उलगडून दाखवणारं संग्रहालय अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं इथे आहेत.
शैक्षणिक संस्था व शैक्षणिक सुविधा | Education in Ratnagiri
रत्नागिरीमध्ये अनेक नामवंत शिक्षणसंस्था कार्यरत असून इथे शिकलेले अनेक लोक देशविदेशात उच्च पदं भूषवत आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, मत्स्य महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही इथे अनेक वर्षांपासून नावारूपास आली आहे. रत्नागिरीनजीक शिरगाव येथे महिला महाविद्यालय आहे. भाट्ये येथे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयही आहे.
सांस्कृतिक वातावरण | Ratnagiri’s Culture
रत्नागिरीचं सांस्कृतिक वातावरणही अतिशय समृद्ध आहे. रत्नागिरीत सांगीतिक आणि नाट्यचळवळ सक्रिय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या सुसज्ज रंगमंचावर अनेकदा राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांचं आयोजन केलं जातं. स्थानिक कलाकारांच्या नाट्यकलेला यामुळे प्रोत्साहन मिळतं. इथल्या संगीत नाटकांनी अखिल भारतीय पातळीपर्यंत आपला ठसा उमटवलेला आहे. त्यातून रंगभूमीला अनेक उमदे कलाकार प्राप्त झालेत. जुन्या नाटकांबरोबरच नवीन लेखकांनी लिहिलेली नाटकंही इथे सादर केली जातात.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थानबद्ध असताना ‘संन्यस्त खड्ग’ सारखं नाटक लिहून नाट्यलेखनाचा पायंडा इथे घालून दिला असून हा वारसा पुढच्या पिढीतले लेखकही जपत आहेत. शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या संस्थाही इथे कार्यरत आहेत. संगीताबरोबरच नृत्यविद्यालयही इथे उपलब्ध आहे.

सण-उत्सव | Festivals in Ratnagiri
शिमगोत्सव, श्रावणात श्री देव भैरी शिमगोत्सव, भगवतीच्या आणि जुगाईच्या मंदिरातील नवरात्रोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, माघी गणेशोत्सव असे अनेक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. रत्नागिरी आणि आसपासच्या गावांमधील शिमग्याचे खेळे, नमन,जाखडी तसंच गावोगावची आरत्या म्हणणारी मंडळी, भजनी मंडळं ही इथली खासियत आहे. शेतीभाती आणि उदोगधंदे करणाऱ्या लोकांना काही वेळ विरंगुळा मिळावा हाच त्यातला मुख्य हेतू आहे.
खाद्यसंस्कृती | Food Culture in Ratnagiri
रत्नागिरीची खाद्यसंस्कृती हा सुद्धा स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी शाकाहारी मांसाहारी व मत्स्याहारी अशा सर्व प्रकारचा चविष्ट आहार वेगवेगळ्या उपहारगृहांमध्ये आणि घरगुती स्वरूपात मिळण्याची उत्तम सोय आहे.लग्नसमारंभांमध्ये उपस्थित मंडळींना रुचकर भोजन मिळण्याची उत्तम सोय इथे वर्षानुवर्षं कार्यरत असलेल्या मंगल कार्यालयांमधून केली जाते त्यामुळे यजमानांना कार्य उत्तमरीत्या पार पडल्याचं समाधान मिळतं.
याआधीच्या परिच्छेदांमध्ये इथली पर्यटनस्थळं आणि निसर्गसौंदर्य यांचा उल्लेख आहेच पण रत्नागिरीबरोबरच साधारणतः ५० किमि अंतरावर असलेल्या आसपासच्या गावांमध्येही अनेक पर्यटन स्थळं आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत. यामध्ये प्रामुख्याने पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळे येथील स्वयंभू गणपती मंदिर आणि समुद्रकिनारा, आडिवरे येथील महाकाली मंदिर, कशेळीचं कनकादित्य मंदिर आणि जवळच असलेलं समुद्रातील देवघळ हे ठिकाण सुप्रसिद्ध आहे. गावखडीच्या किनाऱ्यावर भरवला जाणारा कासव महोत्सव पहायलाही आसपासचे खूप लोक जातात. गणपतीपुळ्याचं गणेशमंदिर, जयगडजवळ असलेलं कराटेश्वर मंदिर, जयविनायक मंदिर, आरे वारे समुद्रकिनारा ही पर्यटकांचं आकर्षण असलेली ठिकाणं आहेत.
जयगड येथील जिंदाल कंपनी तसंच रनपार येथील फिनोलेक्स कंपनी, रत्नागिरी येथील गद्रे मरीन्स हा मत्स्यप्रक्रिया उद्योग ही औद्योगिक क्षेत्रातल्या प्रगतीची निदर्शक असलेली प्रमुख केंद्र असून यांमध्ये अनेक स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असतो.
समुद्रकिनारे | Beaches in Ratnagiri
भाट्ये समुद्रकिनारा | Bhatye Beach
रत्नागिरी शहराजिक हा समुद्रकिनारा असून अनेक पर्यटकांनी स्वच्छ सुंदर किनारा असं याचं वर्णन केलं आहे. किनाऱ्यालगत सुरुबन, झरीविनायक मंदिर हे स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खास आकर्षण आहे.जवळच भाट्ये नारळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका सुद्धा आहे. किनाऱ्याला लागून छोटी मोठी हॉटेल्स, खाद्यपदार्थ शहाळ्याचं पाणी, शहाळी मिळण्याची सोय आहे.
मांडवी समुद्रकिनारा | Mandvi Beach
रत्नागिरी शहरात खूप प्रसिद्ध असलेला हा किनारा आहे. पर्यटकांना समुद्रसौंदर्य पाहण्यासाठी प्रशस्त जेट्टी बांधलेली असून आजूबाजूला भरपूर निसर्गसौंदर्य न्याहाळता येतं. भगवती किल्ल्यानजिक असलेला दीपस्तंभ,बंदरात येणाऱ्या बोटी असं विहंगम दृश्य किनाऱ्यावरून पहायला मिळतं. भोजन आणि निवासाची सोय असलेली हॉटेल्सही जवळपास उपलब्ध आहेत.
कुर्ली समुद्रकिनारा | Kurli Beach
रत्नागिरीपासून अगदी काही अंतरावर कुर्ली या गावी नव्याने विकसित झालेला हा शांत आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे.शहरातल्या गर्दीपासून शांत जागी पर्यटन आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे आवर्जून भेट देत असतात.
वायंगणी किनारा | Waiygani Beach
हाही रत्नागिरी जवळच नव्याने विकसित होत आहे आणि पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण आहे.
गणेशगुळे समुद्रकिनारा | Ganeshgule Beach
रत्नागिरीपासून साधारणतः १५ किमी वर असलेलं गणेशगुळे हे पावसनजिकचं गाव तेथील स्वयंभू गणपतीमंदिरासाठी प्रसिद्ध आहेच पण येथील समुद्रकिनाराही विस्तीर्ण,स्वच्छ आणि पर्यटकांना भुरळ पाडणारा आहे.कोकणी घरगुती उत्पादनं तयार करणारे उद्योग इथे आहेत. ट्री हाऊस, राहण्याची, भोजनाची घरगुती आणि व्यवसाय म्हणून सोय करणारे लोक गणेशगुळे इथे आहेत.
गावखडी किनारा | Gaokhadi Beach
पावसपासून पुढे २० किमी वर पूर्णगड खाडीवरील पूल ओलांडून गेलं की गावखडी हे गाव आहे आणि तिथेही विस्तीर्ण व आकर्षक समुद्रकिनारा आहे. पर्यटकांना भुरळ घालणारा किनारा व तिथे केलं जाणारं कासव संवर्धन हाही पर्यावरण आणि पर्यटन यांची सांगड घालणारा विषय लोकांना आकर्षून घेतो.
काळबादेवी, आरेवारे, गणपतीपुळे समुद्रकिनारा | Kalbadevi, Aareware, Ganapatipule Beach
रत्नागिरीनजिक शिरगाव इथून पुढे साखरतर खाडीवरील पूल पार करून गेलं की काही अंतरावर काळबादेवी हे निसर्गरम्य गाव लागतं. इथेही सुंदर समुद्रकिनारा, किनाऱ्यानजिक रामेश्वराचं मंदिर, तंबूघरे असं पर्यटकांना मोहविणारं वातावरण आहे. त्याच भागातून पुढे गेल्यावर आरे-वारे समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावू लागतो. विस्तीर्ण व आकर्षक किनारा, आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा, कौलारू घरं यांनी वेढलेला हा परिसर फार रमणीय आहे. एका बाजूला किनारा, सुरुबन, इथे येणारे विविध पक्षी आणि दुसरीकडे उंचच उंच डोंगर यातून दिसणारी लाल माती, चढणीचा रस्ता आणि समोर नजर न पोचेल असा समुद्र असं निसर्गरम्य दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. त्याच रस्त्याने पुढे गेलं की नेवरे, भंडारपुळे ही किनाऱ्यावरची गावं आणि पुढे देशभरातून येणाऱ्या भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं ऐतिहासिक गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीमन्दिर हा सर्वच यात्रेकरूंना खुणावणारा विषय आहे.
गणपतीमंदिराच्या दारातच असलेला समुद्र जणू गणपतीचा चरणस्पर्श आपल्या लाटांमधून करत असतो. प्रशस्त उपहारगृह, प्रवाशांच्या राहण्याची, भोजनाची सोय करणारे गृहोद्योग, कोकणी उत्पादनं विकणारे लोक इथे भरपूर आहेत. गणपतीपुळ्यातच प्राचीन कोकण हे कोकणी संस्कृतीच्या खुणा जपणारं ठिकाण आहे. पुढे मालगुंड या गावी कवी केशवसुतांचं स्मारक, तिथलं काव्योज्ञान हे साहित्यिकांसाठी वंदनीय स्थान आहे. इथे वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सादर होत असतात.
रत्नागिरी-जयगड रस्त्यावर असणारं श्री कराटेश्वर मंदिर अगदी समुद्राच्या लगत आहे. देवळाच्या पायथ्याशी असलेली गोड्या पाण्याची विहीर आणि काही अंतरावर असलेलं समुद्राचं खारं पाणी हा एक नैसर्गिक चमत्कारच! आसपासच्या परिसरातच जिंदाल उद्योगसमूहाने बांधलेलं जयविनायक मंदिर आणि बाजूला फुलझाडांची आकर्षक बाग हे अगदी आनंददायी दृश्य आहे.
रत्नागिरीत कसे पोहोचाल | How to reach Ratnagiri
रत्नागिरीत जायचं म्हणजे सध्या नक्की कुठून आणि कसे मार्ग सुरु आहेत त्याची माहिती असणे गरजेचे आहे. रत्नागिरीत जाण्यासाठी महामार्ग, रेल्वेमार्गाद्वारे आपण प्रवास करू शकतो. मुंबई पुण्याहून अनेक चाकरमानी कोकणामध्ये दाखल होत असतात. आत्ता पाहूया काही रत्नागिरीत येण्याचे मार्ग जे सध्याच्या घडीला एकदम उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.
अशा लाल मातीत जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते भारती संस्कृती ही
घरातून दारात वृंदावना
– कै.डॉ.वसंत सावंत
वरील ओळींमध्ये ज्येष्ठ कवी कै.डॉ.वसंत सावंत यांनी कोकण, इथली लाल माती, इथलं निसर्गसौंदर्य, इथला इतिहास,संस्कृती यांचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. कोकण आणि रत्नागिरी वेगळे होऊच शकत नाही त्यामुळे या काव्यात वर्णन केलेला शब्द न शब्द रत्नागिरीच्या बाबतीत खरा आहे !