कोकण आणि कोकणातील शिमगा याचे नाते काही अतूटचं आहे. शिमग्याच्या उत्सवासाठी अगदी परदेशाहूनही कोकणवासीय हजेरी लावतो. त्यामध्ये श्री देव भैरीचा शिमगोत्सव, पालखी खेळवणे, मिरवणूक, गावप्रदक्षिणा, नाक्या नाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले भाविक, वर्षातून एकदा देव आपल्या घरी येणार ही कल्पनाच खूप आल्हाददायी असते प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी, पालखीच्या आगमनाच्या वेळी सर्वत्र केलेली सजावट, रोषणाई, रस्त्यावर काढलेल्या दुतर्फा रांगोळ्या, श्री देव भैरीचे औक्षण करण्यासाठी सुवासिनींची होणारी लगबग, प्रत्येक घरामध्ये बोलले जाणारे नवस, स्वीकारले जाणारे उलपे, प्रसाद, नैवेद्य, गाऱ्हाणी या सगळ्या गोष्टींचे सुख फक्त आणि फक्त एक रत्नागिरीकरचं घेऊ शकतो. श्री देव भैरीची पालखी खेळवण्यासाठी अंगात निर्माण होणारा संचार हे फक्त कोकणवासीच अनुभवू शकतो. गावागावातील होणार्या पालख्यांच्या भेटी, पालखी नाचविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असतात.
रत्नागिरीच श्री देव भैरी ग्रामदैवत
कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एकतरी ग्रामदैवतेच देवस्थान पाहायला मिळते. प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी ते श्रध्दास्थान असतं. रत्नागिरीच श्री देव भैरी हे ग्रामदैवत. कोकणातील समुद्र किनारपट्टीपासून ते अगदी सडयापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहरामध्ये स्थित असलेले श्री देव भैरी ग्रामदेवतेचं मंदिर हे इतर मंदिराप्रमाणे पुरातनकला जपलेल आहे. शंकराच्या मंदिराप्रमाणेचं या मंदिराची रचना असून उतरत्या छपरावर, मातीची कौले आज ही मंदिराचं वैविध्य टिकवून आहेत.
भैरी देवस्थानचा सर्व परिसर वेगवेगळ्या सुशोभित झाडांनी तसेच जुन्या डेरेदार वृक्षांनी वेढलेला आहे. मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलाव आहेत. त्यांची विशेष रचनात्मक बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचे दावेदार आहेत. या मंदिराला लाभलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या 12 वाड्याच नाहीत, तर शहरात प्रवेश करणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतोचं. येथील लोकांची श्री देव भैरीवर अफाट श्रद्धा आहे. भैरीबुवाचे लक्ष अख्या रत्नागिरीवर तसेच बारवाड्यावर असून, प्रत्येकाच्या हाकेला तो धावून येतो अशी सर्व कोकणवासियांची ठाम श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळातील आजी आजोबांकडून ऐकलेल्या दंतकथा पण खूप रंजक असायच्या. पूर्वी असे म्हटले जायचे कि, श्री देव भैरी ग्रामप्रदक्षिणेला सफेद घोड्यावर बसून, शुभ्र वस्त्र परिधान करून अगदी राजासारखा जात असे. जरी प्रत्यक्ष दर्शन नाही झाले तरी ठराविक वेळ झाली कि घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने गेल्यासारखा ऐकू यायचा. दूर गेल्यावर पांढरी सावली जातेय असा भास व्हायचा. कोणीही काही संकटात असले आणि अगदी उशिरा एकट्याने घरी जायची वेळ आली तरी भीती वाटू नये म्हणून संरक्षणासाठी भैरी बुवाचा धावा करत असत. तेंव्हा सुद्धा घुंगरू काठीचा आवाज ऐकायला येत असे आणि घरी सुखरूप पोहोचल्यावर आवर्जून देवाचे आभार मानले जायचे.
श्री देव भैरी मंदिराचा इतिहास
या पुरातन मंदिराचा इतिहास पाहता, मिळालेल्या माहितीनुसार, 1731 सालच्या सुमारास कान्होजी आंग्रेंचा मुलगा सेखोजी हा आपल्या आरामारासह रत्नागिरीमध्ये आला होता, तेंव्हा त्याच्यासोबत पाच गुजर समाजाची कुटुंबे होती. यांनी शहरामध्ये या मंदिरांची स्थापना केली असे म्हटले जाते. कोकण आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली खोतकी ही फक्त कोकणामध्येच दिसून येते. पूर्वीच्या काळी गावाचा कारभार सावंत-खोत मंडळींकडेच असायचा, गावाचा तसेच मंदिराचा सारा कारभार त्यांच्या हाती असायचा. अगदी 1967 सालापर्यंत या मंदिराचा कारभार सावंत-खोत मंडळींच्या हातूनच चालवला जात असे. 1976 साला नंतर मात्र या मंदिरात पब्लिक ट्रस्टची स्थापना केली गेली आणि तेव्हापासूनच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार चालवाला जातो. मंदिरात भव्य प्रांगणातून मंदिरात प्रवेश करतानाच लांबूनच श्री देव भैरीचे दर्शन होतं. या मंदिरामध्ये तृणबिंदुकेश्वराचं मंदिर आहे. प्रथम तृणबिंदुकेश्वर, त्यानंतर तेथील अन्य पाच मंदिरांची दर्शन घेऊन मगच भैरीचं दर्शन घेण्याची इथे रूढ प्रथा आहे. रत्नागिरीकरांची भैरीच्या या मंदिरात पहाटेपासून ते अगदी उशिरा रात्रीपर्यंत कायम गर्दी असते. कोणत्याही शुभ अथवा नवीन कार्याला सुरुवात करण्यापूर्वी सर्वचजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नारळ वाढवून, प्रसाद अर्पण करून, यशस्वी होण्यासाठी माथा टेकवून प्रार्थना करून आशीर्वद घेतात. मंदिर देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे सांगतात, कि या ऐतिहासिक मंदिरातील प्रत्येकाचे मानपान वर्षानुवर्षांपासून जोपासलं जात आहे.
या मंदिरामध्ये वर्षभर विविध उत्सव जल्लोषात साजरे केले जातात, पण शिमगोत्सवामध्ये फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसरामध्ये रत्नागिरीकरांची भरभरून उपस्थिती असते. वर्षातून एकदा श्री देव भैरीच्या भेटीला रत्नागिरी शहर आसपासच्या परिसरामधील ग्रामदेवतांच्या पालख्या वाजतगाजत येतात. भैरी मंदिराच्या आवारात होणारी ही देवांची भेट होण्याचा क्षण पाहण्यासाठी दूरवरून लोक हजेरी लावतात, हल्ली होणारी गर्दी पाहून त्याचे ऑनलाईन प्रक्षेपणही स्थानिक न्यूज वरून केले जाते. ही पालख्यांची होणारी भेट अंगावर रोमांच उभी करणारी असते. भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवायला सुरुवात करतात.
शिमगोत्सवावेळी भैरीच्या पालखी दर्शनासाठी अफलातूनन गर्दी उसळते. ग्रामदेवता ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. सोबत पारंपरिक निशाण अबदागीर यांसह ही पालखी रात्रभर मानपानाप्रमाणे वाड्यावस्त्यांमध्ये फिरते. बारा वाड्यातील एकूण 22 जातीजमातींचे लोक एकत्रितरित्या हा उत्सव साजरा करतात. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे शिमगोत्सवातील होळीमध्ये अगदी मुस्लीम समाजाचा ही सहभाग असून त्यांचाही मान जपला जातो. ठराविक ठिकाणी हातभेटीचा नारळ एकमेकांना देऊन गुलाल उडवून धुळवड साजरी केली जाते. फाल्गुन शुक्ल पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरमाडाची मोठी होळीची तोड केली जाते. त्याचीही ऐकिवात असेलेली कथा म्हणजे पूर्वज असे सांगतात कि फक्त भैरी बुवाची होळी ही सुरमाडाची असते. आणि देव स्वतः जाऊन आपली होळी शोधून आणतो. जेंव्हा पालखी निघते होळीसाठी सुरमाड शोधायला तेंव्हा अगदी वार्याच्या वेगाप्रमाणे धावत जाऊन ज्या झाडाची निवड करणार त्या झाडाला जाऊन पालखी टक्कर देते आणि मग त्या झाडाची तोड करून भैरीची होळी उभारली जाते.
शिमागोत्सावाम्ध्ये प्रत्येक रत्नागिरीकर अथवा कोकणवासीय हा फक्त एक भैरी भक्त म्हणूनच तिथे वावरत असतो. ना तेंव्हा कोणता जात, मानपान अथवा पद आड येत. हे सारे विसरुन ही होळी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत, फाका घालत होळीच्या पारंपरिक स्थानावर म्हणजेच सहाणेवर आणली जाते. त्यानंतर पूर्वापारपणे 11 नारळाच तोरण बांधून होळी उभारली जाते, हा उत्सव पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी असते. कसलंही ही मोठं संकट असलं, तरी एकीने कोणत्याही संकटावर मात करून यशस्वी होता येत, हेच जणू सांगून या ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवामधून बोध घेता येण्यासारखं आहे. कोकणातला शिमगोत्सव हा फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणपणे गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणामध्ये असलेले शिमग्याचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्य आहे. त्या काळात ओसंडून वाहणारा उत्साह तर दिवाळीपेक्षा किती तरी पटीने अधिक असतो. चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावच्या घरी आवर्जून येतात.
वर्षातून एकदा फाक पंचमीला श्री देव भैरी आपली बायको देवी जुगाईची भेट घ्यायला तिच्या मंदिरात जातो. तेंव्हा त्यांच्या भेटी दरम्यान काही तासांसाठी मंदिरातील दिवेही मालविले जातात. तिथे काही तास वास्तव्य करून भैरी आपल्या पुढील ग्रामप्रदक्षिणेला निघतो. रंगपंचमीच्या दिवशी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजता सहाणेवरून उठते. कोकणामध्ये ही एक आगळीवेगळी परंतु अगदी ब्रिटीश काळापासून सुरु असलेली ही परंपरा आहे. रंगपंचमी खेळायला भैरीची पालखी गावातून निघताना ४ सशस्त्र पोलीस कर्मचारी सलामी घेऊन भैरीला मानवंदना देतात. काही वेळेला महिला पोलीस देखील एलएलआर बंदुकीद्वारे ही सलामी देतात. एक मिनिटाची ही मानवंदना स्वीकारून पालखी खेळवायला सुरुवात होते.
हुरा रे हुरा… आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे… होलिओ… अशा फाका घालत ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव कायम उदंड उत्साहात साजरा केला जातो.