लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी उपक्रमांतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालय,रत्नागिरी या कार्यालयाच्या इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती, नूतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकरण या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ऑनलाईनद्वारे पालकमंत्री ॲड. अनिल परब उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरी मध्ये वाचक वर्ग मोठा आहे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे सुसज्ज ग्रंथालय लवकरच येथे उपलब्ध होईल. या आधुनिक वाचनालयाचा येथील तरुण-तरुणींना नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी केले.
शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या नूतनीकरणासाठी मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात मुख्य भूमिका पार पाडल्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब म्हणाले. लोकमान्य टिळक शासकीय ग्रंथालयाच्या आधुनिकरणाला ४ कोटी २५ लाख देण्यात आले आहेत. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ लिमये, डॉ. प्रकाश देशपांडे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, ग्रंथपाल डॉ. विजयकुमार जगताप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याला अनेक प्रख्यात विचारवंतांचा वारसा लाभला आहे. या कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत येथील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षासाठी प्रयत्न करत आहेत अनेक जणांनी आयएएस, आयपीएस पदावर कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देताना येथे सुसज्ज असे आधुनिक वाचनालय उभे राहणार आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरीमधून विविध क्लास वन अधिकारी आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.