कोरोनावरील लसीकरण मोहीम रत्नागिरीमध्ये वेगाने सुरु आहे. ज्याप्रमाणे लसीचा पुरवठा केला जात आहे त्याप्रमाणे नियोजन करून रत्नागिरी शहरामध्ये लसीकरण प्रभागनिहाय केले जाण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक यांनी केली आहे.
रत्नागिरीमध्ये वृद्ध, दिव्यांग यांचे जसे विशेष लसीकरण केले गेले तसेच प्रभागानुसार लसीकरण केल्याने लसीकरणाची गती वाढून गर्दी न होता जास्तीत जास्त जणांचे लसीकरण पूर्ण होईल. ४५+ वयोगटातील व्यक्तींचे तसेच शारिरीक अथवा मानसिक दृष्ट्या व्यंग असणार्या व्यक्तींना रांगेमध्ये बराच वेळ उभे राहून लस घेणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा शासनाने त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली होती.अशा प्रकारचे लसीकरण राबविल्याने या गटात मोडणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे त्रास जाणविला नाही आणि लसीकरण योग्य प्रकारे करता आले.
रत्नागिरीमध्ये कार्यरत असणार्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापूरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हापरिषद उपाध्यक्ष उदय बने, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन करमकर, तालूकाध्यक्ष व नगरसेवक मून्ना चंवडे, नगरसेवक राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, मानसी करमकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर यांनी एकत्र मिळून निवेदन दिले. असे प्रभागाप्रमाणे लसीकरणाला परवानगी दिली तर यामध्ये आम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकतो, तुम्ही फक्त आम्हाला प्रभागानुसार केंद्र करून द्यावे अशी प्रमुख मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. यावेळी अशा प्रकारचे लसीकरण करणे फायदेशीर ठरू शकते आणि हा मॉडेल पँर्टन जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रभागांमध्ये राबविण्यात येईल असे आश्वसन देण्यात आले आहे.