रत्नागिरी जिल्ह्याला धान्यपुरवठा करणाऱ्या एफसीआय गोडावून मधून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून धान्याची उचल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे याचा वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असून सुमारे २० हजार टन धान्याची उचल गोडावून मध्येच शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यातील धान्य पुरवठा व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. यामागील कारणाचा शोध घेतला असता, ठेकेदार आणि हमाल यांच्यातील वाद टोकाला गेल्याने त्यांनी धान्याची उचल करण्यास नकार दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धान्य वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हमालांना धान्य उचलीचा ठराविक खर्च शासनामार्फत ठरलेला असतो. परंतु, या वाराईवरून म्हणजेच धान्य उचलीचा अधिकचा खर्चावरून ठेकेदार आणि हमाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याने, धान्य वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
एफसीआय गोदामामधून धान्य उचल करताना हमालांना वाराई दिली जाते; मात्र ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. ठेकेदाराने ही वाराई द्यावी, अशी हमालांची मागणी आहे. मात्र ठेकेदार त्यासाठी तयार नाही. हमाल आपल्या मागणीवर ठाम असून वाराई नाही दिली तर आम्ही धान्य केवळ ट्रकच्या हौदयापर्यंतच आणून देऊ, ते ट्रकमध्ये भरणार देणार नाही, अशी अट हमालांनी घातली आहे.
वाराई नक्की कोणी द्यायचा हेच स्पष्ट होत नसल्याने या मागणीसाठी एफसीआय गोडावूनमधील हमालांनी धान्य उचल बंद केली आहे. या बंदचा जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून सुमारे साडे आठशेपेक्षा अधिक रास्त धान्य दुकानांमध्ये धान्यच पोचलेले नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.