27 C
Ratnagiri
Saturday, September 23, 2023
HomeRatnagiriरत्नागिरी शहर ११ तास काळोखात वाहिनीवर कोसळले झाड…

रत्नागिरी शहर ११ तास काळोखात वाहिनीवर कोसळले झाड…

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे, मात्र या वादळामध्येच आपत्कालीन यंत्रणेचा चांगला कस लागला. शहरातील मुरलीधर मंदिर येथे रविवारी (ता. ११) रात्री बाराच्या सुमारास मुख्य वाहिनीवर झाड पडल्याने त्या भागातील ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. रात्री झाड हटवणे धोकादायक असल्याने आज सकाळी ते हटवून विद्युतपुरवठा सुरळीत केला, मात्र रात्रभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी आपत्कालीन यंत्रणेच्या नावे शिमगा केला. पावसाळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांची बैठक घेतली. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव किनारी भागात जाणवत आहे. त्यामुळे समुद्राला उधाण असून, सोसाट्याचा वाराही आहे. त्याअनुषंगाने आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आदेश प्रशासनाने सर्व विभागाला दिले.

मांडवी, मिऱ्या, गणपतीपुळे आदी किनारी भागात समुद्राच्या लांटांचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरवात केली. यावेळी शहरातील मुरलीधर मंदिर येथील झाड मुख्य विद्युत वाहिनीवर पडले. त्यामुळे मांडवी, खालचीआळी, राजिवडा, फगरवठार आदी भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला. रात्री वीज खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले. महावितरणच्या झाडगाव येथील कार्यालयाला फोन करून चौकशी करू लागले. फोन व्यस्त आल्याने काही संतप्त ग्राहक तिकडे गेले. कर्मचारी आणि त्याच्यात काही बाचाबाची झाली, परंतु रात्री मुख्य वाहिनीवरील झाड हटवणे धोकादायक असल्याने रात्री महावितरणकडून काहीच काम झाले नाही, मात्र याचाच ग्राहकांना प्रचंड राग होता.

अनेकांनी फोनवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वाद घातला. एक, दोन तास नव्हे तर या भागातील ग्राहक ११ तास अंधारात होते. असह्य उकाडा होत असल्याने नागरिक अधिक संतप्त झाले. सोमवारी (ता. १२) सकाळी महावितरणने क्रेन आणून बुममध्ये कर्मचाऱ्याला बसवून कटरणे फांद्या तोडून वाहिन्या रिकाम्या केल्या. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास या भागात विद्युतपुरवठा पूर्ववत झाला.

RELATED ARTICLES

Most Popular