30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeRatnagiriपाऊस नसतानाही अचानक अजस्त्र लाटा उसळल्या , गणपतीपुळ्याचा किनारा पर्यटकांना बंद

पाऊस नसतानाही अचानक अजस्त्र लाटा उसळल्या , गणपतीपुळ्याचा किनारा पर्यटकांना बंद

खवळलेल्या समुद्रातून उसळणाऱ्या अजस्त्र लाटांचे तांडव पाहून गणपतीपुळे आणि परिसरात येणाऱ्या पर्यटकांना हा समुद्रकिनारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समुद्र शांत होईपर्यंत या समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन रत्नागिरीच्या तहसीलदारांनी जनतेला केले आहे. दरम्यान, सलग ४ दिवस, अजस्त्र लाटांनी दिलेल्या तडाख्याने किनाऱ्यावरील अनेक छोटी दुकाने भुईसपाट झाली आहेत. रविवारी उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात अनेक पर्यटक अडकले होते. पाण्याचो अंदाज न आल्याने एक मुलगा बुडता बुडता वाचला तर १५ ते १६ पर्यटक या लाटेच्या तडाख्याने जखमी झाले. मालगुंडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, गेले दिवस लाटांच्या तडाख्याने नुकसान तर झालेच जोडीलाच समुद्रकिनारी अस्वच्छतादेखील निर्माण झाली होती. सोमवारी किनाऱ्यावर साफसफाई मोहीम राबविण्यात आली.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मागील चार-पाच दिवस कोकणकिनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे. गणपतीपुळ्यामध्ये सलग ४ दिवस अजस्त्र लाटांचे तांडव पहायला मिळाले. १० ते १२ फूट उंच उसळणाऱ्या लाटांमुळे गणपतीपुळेच्या किनारपट्टीवर असणारी छोटी-छोटी दुकाने (स्टॉल्स्) भुईसपाट झाले गुरूवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे ४ दिवस या तडाख्याने गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर लाटांचे तांडव पहायला मिळाले. त्यामध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. रविवारी नेहमीप्रमाणे गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी होती. दिवसभरात जवळपास २० हजारपर्यंत पर्यटक गणपतीपुळे येथे आल्याचे सांगण्यात येते. सायंकाळपर्यंत समुद्राला ओहोटी होती. त्यामुळे किनाऱ्यावर पर्यटक मौजमजा करत होते.

मात्र सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास समुद्राने रौद्ररूप धारण केले. अजस्त्र लाटा उसळल्या. त्यामुळे पर्यटकांची धावाधाव सुरू झाली. पाण्याचा प्रचंड वेग आणि उरात धडकी भरवणाऱ्या जवळपास १० ते १२ फूट उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यापासून बचाव करण्यासाठी किनाऱ्यावर मौजमजा करणारे पर्यटक मंदिराच्या दिशेने धाव घेऊ लागले. मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्याआधीच या लाटा अनेकांच्या अंगावर धडकल्या. त्यामुळे अनेकजण खाली पडले. त्यांना उठता येत नव्हते. या अजस्त्र लाटांच्या तडाख्याने जवळपास १५ जण जखमी झाले.

दुसरीकडे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरून गणपतीपुळे मोरया चौक ते रेस्टहाऊसच्या रस्त्यावर उंचच उंच लाटा आदळत होत्या. या लाटांमुळे आलेल्या पाण्यात अनेक महिला पर्यटकांच्या पर्स, मोबाईल फोन वाहून गेले. अनेकजण जखमी झाले. त्यांना औषधोपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही घटना घडताच जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप खळेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ गणपतीपुळे किनाऱ्यावर पोहोचले. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याआधीच मदतकार्य सुरू केले होते. सर्व पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना ग्रामपंचायत, सुरक्षा रक्षक आणि देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांसह स्थानिक नागरिकांनी मदत केली.

समुद्राच्या लाटेसोबत पाण्यात ओढला जाऊन एक मुलगा बुडता बुडता वाचला. जीवरक्षकांनी वेळीच धावपळ करत त्याला वाचवले. दरम्यान सोम वारी सायंकाळपर्यंत तरी समुद्र तुलनेने शांत होता. उंचच उंच लाटा उसळण्याचे प्रमाणदेखील घटल्याचे दिसत होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र शांत होईस्तोवर गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पर्यटकांनी या किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन रत्नागिरीच्या तहसीलदारांनी केले आहे. त्यामुळे हा किनारा पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ४ दिवस उसळणाऱ्या अजस्त्र लाटांनी सर्वांच्याच मनात भीतीने घर केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular