रत्नागिरी शहरामध्ये राजरोसपणे अंमली पदार्थांची विक्री होत आहे. आधी ज्या गोष्टी लपूनछपून केल्या जात असत त्या आत्ता खुलेआम आणि तेही शहर पोलीस स्थानकाच्या आसपासच्या परिसरामध्ये होऊ लागल्याने रत्नागिरीवासियामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट जवळील खान कॉम्प्लेक्समध्ये गांजाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डीबी स्कॉड सोबत खान कॉम्प्लेक्स येथे पोहोचले असता, त्या ठिकाणी कारवाई करत संशयित बिलाल अश्रफ शेख, सलमान लियाकत कोतवडेकर, संजय ठिका राणा, रामपाल भगत राणा या चौघांना रंगेहाथ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून गांजाची ६३ छोटी पाकिटे जप्त करण्यात आली. एकूण १ किलो गांजा जप्त करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अमली पदार्थ सेवन आणि त्याची अवैधरित्या विक्रीवर पोलीस करडी नजर ठेवून असून अशा अमली पदार्थ विक्रेत्यांची पाळेमुळे शोधून काढण्यात त्यांना यश मिळत आहे.
रत्नागिरी सारख्या लहान शहरामध्ये सुद्धा अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये, ग्रामस्थांमध्ये एक प्रकारे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी पोलीसाना सुद्धा वेळीच गुप्त खबर मिळाल्याने त्यांनी त्वरित छापा टाकून, आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यावेळी विक्री करणारे आणि खरेदी करणारे असे दोन्हीही पार्टीमधील संशयित आरोपी तेथे हजर असल्याने सर्वाना पोलीसांनी ताब्यात घेतले.