कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाची तयारी सध्या जोरदार सुरू असून नागरीकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे; असे असताना रत्नागिरी शहर वाहतुकीच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे याबाबत संबंधितांकडे चौकशी केली असता साहेबांना विचारा असे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
याबाबत माहिती घेतली असता शाळांना सुट्टी पडल्यामुळे शहर वाहतुकीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या काळातच या गाड्या रद्द केल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी असुविधा होत आहे. त्यामुळे अनेकांना पायपीट तर काहींना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सकाळच्या व सायंकाळच्या व गर्दीच्या वेळात काही फेऱ्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खर पाहायला गेल तर, कोरोना काळापासून आणि एसटीच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे पूर्ण एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. आणि तेंव्हा पासून आर्थिक टंचाई भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ अनेक प्रकारे उपक्रम आणि योजना राबवून प्रयत्न करत आहे. परंतु, ग्रामीण भागातील वाहतुकीबाबत मात्र अजूनही वानवा पाहायला मिळत आहे. कारण जेंव्हा शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल तेंव्हा दिवसातील १-२ फेऱ्याच सुरु ठेवून बाकी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्याने, इतर जनतेला मात्र त्रास सहन करावा लागतो.
सध्या गणपतीची घाई गडबड असताना अनेक शहरी फेऱ्या देखील बंद ठेवण्यात आल्याने आधीच महागाईच्या गर्त्यात असलेल्या सर्वसामान्य जनतेला मात्र अधिकचे भाडे भरून रिक्षा किंवा इतर वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याने जनतेत नाराजगी पसरली आहे.