रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती झाली आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही दयनीय स्थिती कधी सुधारणार ? आता श्रावणातील विविध सण आहेत, तसेच कोकणचा गणेशोत्सवही महिन्याभरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवून बाप्पाची स्वारी निर्विघ्नपणे घरी आली पाहिजे. स्मार्टसिटी म्हणून निवड झालेल्या रत्नागिरी शहरातील रस्ते सुधारले नाहीत, तर पर्यटन व्यवसायालाही फटका बसू शकतो. रामआळी, मारुती आळी, एसटी स्टँड, काँग्रेस भुवन, टिळकआळी या सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. शहरात साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण झाले आहे; मात्र मारुती मंदिर ते ८० फुटी महामार्गापर्यंत एका बाजूने काँक्रिटीकरण पूर्ण झाले. आता एका बाजूचे काँक्रिटीकरण होणे बाकी आहे. कोणत्या कारणास्तव हे काम रखडले आहे, याबाबत कोणी माहिती देत नाही. जिल्ह्याची कपडे, गृहोपयोगी साहित्य, दागिने व अन्य वस्तूंची मुख्य बाजारपेठ मानली जाणाऱ्या रामआळीतील खड्ड्यांची स्थिती दयनीय आहे. खड्ड्यांमुळे ग्राहक या रस्त्यावर येतच नाहीत. यामुळे व्यापारीही नाराजी व्यक्त करत आहेत.
खड्ड्यांमुळे गाड्यांची कामे निघाली आहेत. अनेक वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत, अशी चर्चा नाक्यानाक्यावर ऐकू येत आहे. खड्ड्यांत पावसाळी डांबर नाही फक्त लाल डबर टाकल्याने पुन्हा चार दिवसांनी खड्डे मोठे होत आहेत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा पाहणार कोण? आम्ही कर कशासाठी द्यायचा? अशा तीव्र भावना लोकं बोलून दाखवत आहेत. नगरपालिकेवर प्रशासक आहेत. सत्ताधारी व विरोधक प्रशासकाकडे निवेदने देत आहेत; मात्र कार्यवाही होत नसल्याबाबत नागरिक संतापले आहेत. रस्ते करण्यासाठी पालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. जयस्तंभ येथे जवळपास पाच ते सहा फुटांचा खड्डा नसून, खंदकच म्हणावा लागेल. येथून जाताना वाहनचालक अक्षरशः पालिका व ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडतात. गोखले नाक्यावरून मारुती आळीतून जाणाऱ्या या रस्त्यावर खड्यात पाणी साचले आहे. गेल्या आठवड्यात यावर खडी, डांबर आणून खड्डे बुजवले तरी पुन्हा खड्डे पडले.