मुंबई-गोवा महामार्गावरील आगवे येथे पुलावरून ४० फूट खोल नाल्यात मोटार कोसळून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दांपत्यासह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील दोघे पती-पत्नी डॉक्टरांसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. आनंद चंद्रशेखर पोळ, डॉ. समीक्षा आनंद पोळ रा. दोघेही रत्नागिरी असे गंभीर जखमी झालेल्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची नावे आहेत. ते रत्नागिरीहून कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांगाच्या शिबिरासाठी जात होते.
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात गेले दीड वर्ष कार्यरत असलेल्या डॉ. समीक्षा धो.जाधव -पोळ यांचा चिपळूण येथे जात असताना दि. २९/०९/२०२२ रोजी प्रवासा दरम्यान फोर व्हिलर गाडीने जात असताना सावर्डा जवळ भीषण अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना ताबडतोब डेरवण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण विशेष सुधारणा नसल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचे दि.१२/१०/२०२२ रोजी निधन झाले.
इतके दिवस जीवन मृत्युच्या प्रवासाशी सुरु असलेली झुंज अखेर थांबली. कमी कालावधीमध्ये त्यांनी सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमाद्वारे वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. अनेकांनी त्यांचे फोटो स्टेट्सला ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी तर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या वतीने तसेच सर्व डॉक्टर्स, सर्व कर्मचारी, परिचारिका यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या सर्जन डॉ.सई धुरी, डॉ. ज्ञानेश्वर विटेकर, डॉ. उत्तम कांबळे, डॉ. दिवाकर, आस्थापना आधिकारी सीमा हुले,संदिप उगवेकर,राम चिंचोळे आदी उपस्थित होते.