रत्नागिरी शासकीय रूग्णालयाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या २४ सुरक्षा रक्षकांना मागील दीड वर्षभर वेतन मिळालेले नाही. या रक्षकांनी सातत्याने मागणी करून देखील हे वेतन जाणीवपूर्वक अडकवून ठेवले आहे, त्यांच्या मागणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोना संक्रमितांची वाढती संख्या पाहून रत्नागिरी, लांजा, पाली, संगमेश्वर व कामथे येथे या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांना वेतनच अदा करण्यात आलेले नाही. मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे दाद मागूनही हा पगार शासनाच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी २६ जानेवारीला उपोषणाचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी कोरोना काळामध्ये जीवावर उदार होऊन काम केले त्यांना शासन किंवा जिल्हा प्रशासन यंत्रणा वेतन देऊ शकत नाही, यापेक्षा रत्नागिरीकरांचे दुर्दैव ते काय असावे!
कोविडच्या काळात सुरक्षा रक्षक महामंडळ व मेस्को यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. परंतु त्यांनी ताबडतोब सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा सेवा घेण्याचे ठरविले, एकूण २४ सुरक्षारक्षक कोविड सेंटरवर काम करत होते. परंतु, थकीत पगाराबद्दल सुरक्षा रक्षकांना वेळोवेळी एकच कारण सांगितले जात आहे कि, शासनाकडून अजून निधी आलेला नाही. कोविड निधी उपलब्ध आहे, पण त्यामध्ये सुरक्षा सेवा नाही म्हणून नकार दिला जात आहे.
सुरक्षा रक्षकांनी जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांना दिवाळीच्या अगोदर भेटून सर्व कहाणी मांडली, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. कामगार मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर व पत्राद्वारे वेतनाबाबत लक्ष घालण्यास सांगितले होते. परंतु, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार करण्यातच वेळ फुकट दवडत आहेत.