जनसामान्यांची पसंतीची आणि परवडणारी रेल्वे गाडी म्हणजे दादर पॅसेंजर. कोरोना काळापासून बदल करण्यात आलेले सर्व नियम, तिकीट व्यवस्था, आरक्षण, जनरल तिकीट आत्ता कोरोनाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने पूर्ववत सुरु करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून कोकण रेल्वे मार्गारून धावणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वी प्रमाणेच दादरहून सोडून संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे विषयक अभ्यासक अक्षय महापदी यांनी एक सविस्तर निवेदन रेल्वेला दिले आहे.
पूर्वीची गाडी क्र. ५०१०४/ ५०१०३ रत्नागिरी-दादर पॅसेंजरची आता रत्नागिरी दिवा पॅसेंजर झाली आहे. कोरोना पूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येक स्टेशन वर एक अनारक्षित डबा उघडळा जात असे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणार्या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक प्रकारे जिकरीचे ठरत आहे. गाड्या संबंधित स्थानकांत पोहोचण्याआधीच उलट्या दिशेने बसून येणाऱ्या गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेल कि नाही याची देखील शाश्वती नसते.
त्यामुळे, येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणार्या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे.कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्य करून प्रत्येक स्थानकासाठी असणारे अनारक्षित डबे आणि जनरल तिकीटाबद्दल रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर व्यवस्था करावी असे निवेदन करण्यात आले आहे.