निवडणूक आयोगाकडून मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली होती. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडणगड- १४, दापोली- ३०, खेड- १०, चिपळूण- ३१, गुहागर- २०, संगमेश्वर- ३५, रत्नागिरी- २८, लांजा- १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुवा उडणार असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी तहसीलदार १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार असून, त्यानंतर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागवले जातील. अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होईल. ७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानंतर निवडणूक लढवणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आमने सामने उभी राहणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २८ ग्रामपंचायती असून बाळासाहेबांची शिवेसेनेचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर तगडी आवाहने उभे राहणार आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष मंडणगड-खेड-दापोली आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर राहणार आहे. या मतदार संघातील दोन्ही आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. नुकत्याच झालेल्या रत्नागिरीतील चार ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गटाने शह दिला होता. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. ग्रामीण भागातील मतदार नेमका कोणाला मतांचा कौल देतो हे पाहायला मिळणार आहे.