रत्नागिरीमधील कोरोना संक्रमितांच्या प्रमाणामध्ये घट होत नसल्याने जिल्हाधिकार्यांनी पुढील पंधरा दिवसामध्ये दररोज दहा ते बारा हजार पर्यंत कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याची माहिती दिली आहे. ग्रामीण भागांमध्ये जाऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, जी गावे कोरोना चाचणी करण्यास नकार देतील त्यांच्यावर तहसीलदारांमार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स ऑनलाईन संवाद साधला.
संक्रमित रुग्णसंख्या जास्त सापडलेल्या गावांसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या सरसकट चाचण्या करण्याकडे भर देण्यात येणार आहे. लांजा, खेड, दापोलीतील नागरिकांनी या सरसकट होणार्या चाचण्यांना विरोध दर्शविला आहे. तर काहींनी या विरोधातील अनेक पत्रव्यवहार केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. परंतु अशा विरोध करणाऱ्या नागरिकांवर सरळ फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा सूचना तहसीलदाराना देण्यात आल्या आहेत. तसेच या कामामध्ये पोलिसांची मदत घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
रत्नागिरीतील सर्व तालुक्यांमध्ये सध्याच्या घडीला दररोज पाच हजार चाचण्या होतात. त्यामध्ये वाढ करून दररोज १० ते १२ हजार चाचण्या करण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामध्ये पन्नास टक्के आरटीपीसीआर आणि पन्नास टक्के अँटिजेन चाचण्या होणार आहेत. प्रतिदिन प्रयोगशाळेची क्षमता अडीच हजार चाचण्या करण्याची आहे, टी वाढविण्यासाठी मुंबई मधील प्रयोगशाळा शासन निश्चित करून देणार आहे. त्यामुळे अहवाल वेळेत मिळाल्याने उपचार करणे देखील सहज शक्य होईल.