राज्यात येत्या सोमवार पासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणतही पत्रक किंवा आदेश आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. शाळा केंव्हा सुरु करायच्या याचा निर्णय पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली असून, तिसरी लाट आणि ओमीक्रॉनचे वेगाने वाढते संक्रमण लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये कमी कालावधीतच पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गेल्या वीस दिवसात राज्यात कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून सोमवार २४ जानेवारीपासून चालू करा अशा सुचना दिल्या आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही अनुमती दिली आहे. त्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सीईओ डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
सध्या जिल्ह्यात दररोज २०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. शाळा पुन्हा सुरु करण्यापुर्वी पुढील दोन दिवसात काय कोरोना परिस्थिती राहील याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री या नात्याने अॅड. परब २६ जानेवारीला ध्वजारोहणाला रत्नागिरीमध्ये येणार आहेत. त्यावेळी आढावा घेऊन शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा व महाविद्यालये चालू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने कोरोन निर्बधित नियमावली जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानंतर पालकांमध्ये सुद्धा मुलांना शाळेत पाठविण्यासाठी लगबग सुरु झाली होती; परंतु जिल्ह्यात अद्याप कोणतेच आदेश न आल्यामुळे शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे.