प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२२-२३ या साठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांचा समावेश असून, मागील काही वर्षात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दोन्ही फळपिकांना जबरदस्त फटका बसला असून बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आंबा, काजूचा समावेश प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हजार ४७१ बागायतदारांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी यंदापेक्षा जास्त असा २२ हजार शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला होता. सध्या आठ दिवस शिल्लक असून या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या नुकसानीचा विमा उतरवलेल्या बागायतदारांना परताव्याच्या रुपाने याचा लाभ मिळाला होता. यंदाही हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून त्याचा विपरीत परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची शक्यता आहे. किमान तापमान, कमाल तापमान आणि अवेळी पाऊस, गारठा, वारा, गारपीट यासाठी झालेल्या नुकसानीपोटी परतावा मिळणार आहे. यामध्ये काजूसाठी विमा हप्ता ५ हजार रुपये असून एक लाख रुपये संरक्षित रक्कम आहे. तर आंब्यासाठी १३ हजार ३०० हप्ता असून १ लाख ४० हजार संरक्षित रक्कम आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवायाचा आहे. यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनी नियुक्त केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कृषी विभागाकडून बागायतदारांना विमा उतरवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत १५ हजार ४७१ शेतकर्यांनी विमा उतरवला आहे.