जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात केले आहे. ३ आणि ४ डिसेंबरला विविध कार्यक्रम होणार आहेत. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश जोशी आहेत. तसेच समारंभासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, २०२२ मध्ये ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार आहेत.
शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी जीजीपीएस येथून निघणार आहे. शासकीय रुग्णालयमार्गे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात दिंडी येईल. अनेक मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ग्रंथ प्रेमी मोठ्या संख्येने ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीचे उद्घाटन ग्रंथ पूजनाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह करतील.
दुपारी २.३० वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत इतिहासाचे अभ्यासक डॉ. रमेश कांबळे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कोकण या विषयावर व्याख्यान होईल. ३.३० वाजता स्मरण शतायुंचे कार्यक्रममध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, कवी शंकर रमाणी कवयित्री शांताबाई शेळके, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, या थोर साहित्यिकांवर परिसंवाद होईल. यात राजेंद्रप्रसाद मसुरकर, अरविंद कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, मदन हजेरी व शिवराज गोपाळे सहभागी होणार आहेत. अशी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे.