गेली सात वर्षे हे कर्मचारी महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. रत्नागिरी, राजापूर, लांजा आदी तालुक्यातील हे ४० कामगार आहेत. या कंत्राटी कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेतल्याने त्यांनी सामंत यांच्या निवासस्थानी जावून त्यांना धन्यवाद दिले. मंत्री नाम. उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ४० कामगारांना महावितरण कंपनीने पुन्हा कामावर घेतले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही सामंत यांनी चर्चा केली. त्यामुळे हा विषय जैसे थे ठेवून महावितरणने कामगारांना कामावर घेतले आहे.
कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या ४० कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. ठेकेदाराने महावितरण कंपनीला पुरविलेले हे कामगार आहेत. ज्या कुशल कामागारांची नियुक्ती करायची आहे. त्यांना शैक्षणिक पात्रता ठरली आहे. त्यानुसार महावितरण कंपनीच्या नवीन प्रणालीमध्ये जेव्हा कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विषय पुढे आला, तेव्हा आयटीआय किंवा विद्युत क्षेत्रामध्ये काम केलेल्याची कोणतीही कागदपत्र या कामगारांकडे नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयाकडून या कंत्राटी कामागारांना अचानक कमी केले.
इतकी वर्ष सलग सेवा देऊन अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुख्य म्हणजे आर्थिक समीकरण संपूर्ण बिघडून गेली. उत्पन्नाचे साधनच बंद झाल्याने उपजीविकेसाठी काय करायचे असा प्रश्न त्यांच्या आणि कुटुंबासमोर उभा ठाकला. त्यामुळे त्या कर्मचार्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांनी महावितरणची तातडीची बैठक घेवून कोरोना आणि चक्रीवादळाच्यावेळी या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे, याची जाणीव ठेवून त्यांचा सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याबाबत कामगारांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. मंत्री सामंत यांनी महावितरणच्या अधिकार्यांची बैठक घेतली व कर्मचाऱ्याना न्याय मिळवून दिला