खेड तालुक्यातील भेलसई येथे वडिलोपार्जित घराच्या मालकी हक्कावरून चौघांनी एकत्र येऊन दोघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. तालुक्यातील भेलसई येथे राहणारे संतोष सखाराम कदम वय ५१ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष कदम व प्रकाश सखाराम कदम, प्रशांत प्रकाश कदम, पल्लवी प्रकाश कदम, उमेश भाऊराव कदम सर्व रा. भेलसई, ता. खेड यांच्यामध्ये वडिलोपार्जित घराच्या मालकी हक्कावरून अनेक वर्ष वाद सुरु आहेत.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संतोष कदम यांच्या घरी भेलसई गावचे तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम हे आले व त्यांनी मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी संतोष कदम म्हणाले की जर तुमची मिटिंग असेल तर मला त्याला बसण्यात काही स्वारस्य नाही. त्या मुदतीत श्रीधर बाबुराव कदम, गोविंद बाबुराव कदम हे त्याठिकाणी येऊन संतोष कदम याच्या घराच्या ओटीवर बसले. त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम, श्रीधर बाबुराव कदम, गोविंद बाबुराव कदम हे पुन्हा संतोष कदम यांच्या घरातून निघून गेले.
या गोष्टीचा राग मनात धरून प्रशांत कदम याने संतोष कदम याची मुलगी राणी संतोष कदम वय १९ हिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती घराबाहेर आली असता तिला पाहून प्रकाश कदम याने शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. तर प्रशांत कदम व उमेश कदम हे मुलीच्या अंगावर धावत जाऊन मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी मुलीला सोडवण्याकरिता गेलेल्या संतोष कदम यांना देखील आरोपी प्रकाश, प्रशांत यांनी मारहाण केली. तसेच पल्लवी प्रकाश कदम हिने संतोष याच्या डोक्यावर दगड मारून त्यांना गंभीर दुखापत केली. या मारहाण प्रकरणी संतोष कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.