रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू ,नारळ, सुपारी, चिकू आदी फळपिके कोकणात घेतली जात आहेत. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडून एजीअंतर्गत पंप कनेक्शन घेतली आहेत. मुळात संपूर्ण महाराष्ट्रात फळपिके घेतली जात आहेत आणि त्या बागायतींना महावितरणकडून पाण्यासाठी वीजकनेक्शन देण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्याला चारपट दर परिपत्रकानुसार देताना उर्वरित महाराष्ट्रात ऊस, संत्री, द्राक्ष, केळी आदी फळपिकांच्या बागायतदारांना मात्र सवलतीचा दर महावितरण कंपनी आकारते.
वीज कनेक्शन आणि वीजदर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच असताना कोकणात खासकरून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र चढ्या दराने बिल वसुली होते आहे. चारपट दराने लाखो रुपये महावितरण विभागाने वसूल केले असल्याचे आमदार शेखर निकम यांनी समोर आणले आहे.
काही वर्षे कोकणातील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून महावितरण वसुली करत आहे. आमदार शेखर निकम यांनी यावर आवाज उठवला आहे. जो न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असला पाहिजे, अन्यथा उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लावलेला दर लावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे. कोकणातील अन्य लोकप्रतिनिधी आमदार निकम यांना साथ देऊन जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून महावितरणकडून सुरू असलेली वसुली थांबवतात काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना महावितरणचा वेगळा दर लावून चारपट वसुली केली जात आहे आणि उर्वरित महाराष्ट्रावर मात्र महावितरण मेहरबान होत त्यांना वेगळा दर लावण्याचे काम करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून वाढीव वीजबिल वसुली करणाऱ्या महावितरणाविरोधात आमदार शेखर निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यानी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन सर्व समस्या मांडल्या.