जिल्ह्यात अवकाळी सुरु झालेल्या पावसाने बागायतदार धास्तावले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ६ ते १० जानेवारी दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात वर्तवली आहे. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्री साधारण १ वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती.
पहाटेच्या सुमारास जवळपास अर्धा तास सतत कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाले भरून वाहू लागले. पाणी रस्त्यावरून वाहू लागले. सकाळी मारुती मंदिर, सावरकर नाट्यगृहासमोरील खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांची एक प्रकारे कसरतच सुरु होती. सकाळच्या सुमारास पडलेल्या या अवकाळीने हवेत गारठा पसरला होता. मात्र या बदलत्या हवामानाने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी शहर परिसरात पहाटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुरुवातीला हलका पडणारा पाऊस मात्र नंतर वेगानेच पडायला लागला. हवामान खात्याने सुचविले असले तरी, पावसाचा कोणतंही वातावरण नसताना पहाटे अचानक एक दीड तास पाऊस कोसळला. पडलेल्या पावसानंतर वातावरण निरस होते. महाराष्ट्रात इतर भागात पाऊस व गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे अशा अचानक आलेल्या पावसामुळे आंबा शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे
जिल्ह्यात रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे नुकसान झाले आहे. कोकणातील अनेक शेतकर्यांचा कल सध्या काजू लागवडीकडे वाढला आहे. आंबा व्यवसायासोबत काजू व्यवसायातील उलाढाल वाढू लागली आहे. काजूंच्या फवारणीवर हजारो रुपये खर्च केला जात आहे. यंदाच्या हंगामाला चांगली सुरुवात झाली होती. काजू बिया झाडांवर लगडल्या आहेत. मात्र रविवारी पाऊस पडल्याने आता काजूचेही नुकसान होणार आहे. आंब्याला पण आलेल्या मोहोराने या पावसामुळे दुष्परिणाम होईल कि काय म्हणून शेतकरी आणि बागायतदार धास्तावले आहेत.