लाखो रुपयांच्या बनावट नोटा कर्नाटकमध्ये चलनात आणल्याबद्दल रत्नागिरी मधील दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. या प्रकरणी एकूण सहा जण सक्रीय असून, दांडेली ग्रामीण पोलिस ठाण्यातील शिवाजी कांबळेच्या घरावर छापा घातला असता, पोलिसांनी बनावट नोटा छापून घेणाऱ्या सहा जणांना घटनास्थळी अटक केली आहे. या सहा जणांमध्ये रत्नागिरीतील दोघांचा समावेश आहे. कसून तपासणी केली असता, रत्नागिरी मधील हे दोन गुन्हेगार बनावट नोटा खरेदीसाठी आल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.
या गुन्हेगारांकडून एकूण साडेचार लाख रुपये किमतीच्या खऱ्या नोटा आणि एकूण ७२ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या गेल्या आहेत. पोलिसांना बनावट नोटांच्या देवाण घेवाणीची खबर मिळाली असता, साडेचार लाख रुपयांच्या बदल्यात ७२ लाखाची बनावट चलनाची देवाणघेवाण करताना पोलीस पथकाने त्यांना मुद्देमालासह जेरबंद केले.
या बनवत चलन प्रकरणामध्ये दांडेली येथील शब्बीर कट्टी (४५) आणि शिवाजी कांबळे (४२) यांना अटक करण्यात आली. यानंतर अन्य चौघाना अटक झाली. रत्नागिरी मधील किरण देसाई (४०), गिरीश पुजारी (४२) हे दोघे आहेत. तर बेळगाव येथील अमर नाईक (३०) आणि सागर कोंनूरकर यांना मुद्देमालासह पकडण्यात आले. हे चौघेही शब्बीर कट्टी आणि शिवाजी कांबळे यांच्याकडून बनावट चलन खरेदी करत असताना रंगेहाथ पोलिसांच्या ताब्यात सापडले. गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेली दोन वाहने आणि बनावट चलनासाठी वापरण्यात येणारे छपाई साहित्य व ७२ लाखाच्या बनावट नोटा जप्त करून, गुन्हेगारांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.