रत्नागिरीतील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था असलेल्या शिर्के प्रशालेत सेंट्रल किचनच्या माध्यमातून शहरातील शाळांना माध्यान्ह भोजन वाटप करण्याच्या पहिल्याच दिवशी न शिजलेला भात, बिनचवीचे वरण वाटप संबंधित ठेकेदाराने केल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संस्थाचालक, शाळा व्यवस्थापनाकडून हा ठेका रद्द करून जुन्या पद्धतीनेच स्थानिक बचत गटांकडून पोषण आहार वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक महिला बचतगटांकडून काढून घेऊन नवीन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून परजिल्ह्यांतील तीन संस्थाना परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी पालिका आणि पालिका शिक्षण मंडळामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यानुसार ठेकेदारांनी आज पासून पुरवठा करण्यास सुरुवात केली.
मात्र, कोल्हापूरच्या संस्कार महिला मंडळाने पहिल्याच दिवशी शहरातील शिर्के प्रशालेत वितरित केलेल्या आहारातील भात पूर्ण शिजलेला नसून, त्यावर वाढण्यात आलेले वरण देखील बेचव असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. भात कच्चा राहिल्याने काही विद्यार्थ्यांनी भात न खाता तसाच ठेवला. मुख्याध्यापकांनी ही बाब लक्षात आल्यावर ताबडतोब पोषण आहारचे वितरण तेथेच थांबविले.
शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती पाहिली. या गोंधळात मुलांना सुमारे एक तास आहारा शिवायच राहावे लागले. संस्थांना ठेका देण्यापूर्वी दर्जाबाबतच्या सूचना दिलेल्या असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत शिक्षकांसह संस्थाचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सेंट्रल किचनमधून वितरित होणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबतच साशंकता असल्याने ती बंद करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी पूर्वीच केली होती. त्याचप्रमाणे आहार वाटप करणारे कर्मचारीही देखील अस्वच्छ निदर्शनास आले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी म्हटले होते. शिर्के प्रशालेत घडलेली ही बाब गंभीर असून, याची दखल शिक्षण मंडळाने घेतली आहे. शाळेचा अहवाल आल्यावर संस्थेला नोटीस दिली जाईल असे पाटील यांनी सांगितले.

