सध्या अनेक आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात असल्याने अनेक जण विविध पद्धती आणि ऍपचा वापर करताना दिसतात. परंतु, ऑनलाईन व्यवहार करताना तेवढीच सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अनेक वेळा ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे बँक, पोलीस कायम अशा प्रकारच्या ऑनलाईन व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगायला सांगतात.
रत्नागिरी येथील एका गॅरेज मालकाच्या बाबतीत गुगल ट्रान्सफरव्दारे १६ हजार रुपये घेउनही गाडी रिपेरिंगचे सामान ट्रान्सपोर्टव्दारे न पाठवता फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. मिरजोळे एमआयडीसी येथे घडली. याबाबत गॅरेज मालक सफवान हिदायत नाखवा वय २८, रा.पावस पानगलेवाडी,रत्नागिरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, नाखवा त्यांचे एमआयडीसी येथे गॅरेज आहे. शुक्रवारी त्यांनी रिपेरिंगचे आवश्यक स्पेअर पार्ट जस्ट डाईलव्दारे जय लक्ष्मी ट्रान्सपोर्ट रांजणगाव पूणे यांच्याशी संपर्क साधून मागवले होते. त्यावेळी बोलणार्याने ट्रान्सपोर्टचा ट्रक एमएच-१६-सीसी-४५१२ वरील चालक राम नारायण पटेल याच्या पत्त्यासह सफवान नाखवांच्या व्हॉटसअॅपवर फोटो पाठवले. तसेच सायंकाळी ६ वाजे पर्यंत रत्नागिरीत सामान पोहचेल असे सांगून सामानाचे १६ हजार रुपये गुगल पे व्दारे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नाखवा यांनी पैसै ट्रान्सफर केले.
शनिवार २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून गेले तरी सामान न आल्याने नाखवा यांनी जय लक्ष्मी ट्रान्सपोर्टला ५ ते ७ फोन केले परंतू, समोरून कोणीही फोन उचलत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाखवा यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.