राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून देखील कोरोना जवळपास हद्दपारच झाला आहे. मागील काही दिवस एकही संक्रमित रुग्ण सापडलेला नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाला असला तरी वर्ग ३, वर्ग ४ ची कर्मचार्यांची पदे दिवसेंदिवस रिक्त होत आहेत. सुमारे ३८१ पदे सध्या रिक्त आहेत. यामुळे कामकाज चालवताना आरोग्य विभागाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. जरी कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाची हालत एकदम बेकार झाली असली तरी, आत्ता थोडासा दिलासा त्यांना मिळत आहे.
मागच्या वर्षी वैद्यकिय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची अवस्था अगदीच बिघडली होती. मात्र, त्याला पर्याय म्हणून कंत्राटी तत्त्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची जिल्हा स्तरावर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने ४० हजार रुपये मानधनावर नियुक्त करण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाला दिले.
जिल्हा परिषदेची ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी अशी १४१ पदे मंजूर होती. ती सर्वच्या सर्व भरली गेली आहेत. परंतु, वर्ग ३ ची ३०९ आणि वर्ग ४ संवर्गातील ७२ पदे अजूनही रिक्त असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मागची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे खडतर गेल्याने, त्याच प्रमाणे कोरोनामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी देखील दगावले. तसे पाहायला गेले तर गेल्या काही वर्षामध्ये नवीन भरतीच न झाल्यामुळे सेवानिवृत्त देखील वाढत आहेत. त्यामुळे रिक्त पदांची भरती होणे आवश्यक आहे. नाहीतर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरच मोठ्या प्रमाणात कामाचा अतिरिक्त भार पडतो आहे.